SARS-CoV-२ : कोरोनाच्या उगमाबाबत चीनचे पुन्हा खंडन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Claims SARS-CoV-2 found in raccoon dogs seafood wholesale market Wuhan

SARS-CoV-२ : कोरोनाच्या उगमाबाबत चीनचे पुन्हा खंडन

न्यूयॉर्क : कोरोनाच्या जागतिक साथीला आपल्या देशातील प्रयोगशाळेत विषाणूंची अपघाती गळती कारणीभूत ठरल्याचा प्राथमिक निष्कर्ष जगातील एखादी संस्था काढते तोच चीनकडून त्याचे खंडन करणाऱ्या संशोधनाचा दाखला दिला जातो.

यावेळी वुहानमधील सागरी खाद्य घाऊक बाजारपेठेत विकल्या गेलेल्या रॅकून श्वानांमध्ये SARS-CoV-२ हे विषाणू सापडल्याचा दावा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या पथकाने हे संशोधन केल्याचेही आवर्जून सांगण्यात आले.

न्यूयॉर्क टाईम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे. त्यानुसार कोरोना विषाणूच्या जागतिक साथीचा उगम मानवनिर्मित नव्हे तर नैसर्गिक असल्याचा पुनरुच्चार चीनने केला आहे. नव्या संशोधनासाठी हुआनन सागरी खाद्य घाऊक बाजारपेठेत जानेवारी २०२० मध्ये प्राण्यांच्या स्वॅबचे नमुने वापरण्यात आले.

त्याच्या जनुकीय आकडेवारीनुसार हा दावा करण्यात आला. अमेरिकेच्या ऊर्जा खात्याने गुप्तचर संस्थेद्वारे परिक्षण केले होते. वुहानमधील एका विषाणूशास्त्र प्रयोगशाळेतील अपघाती चूक घडून विषाणूंची गळती झाल्याचे यातून सूचित करण्यात आले.

चीनचे नवे दावे

  • विषाणूग्रस्त प्राणी बाजारपेठेतून बाहेर नेण्यात आले

  • प्राण्यांच्या वाहतुकीसाठी वापरलेली वाहने आणि पिंजऱ्यांचा पृष्ठभाग, दोन्हीकडील उभ्या बाजू, धातूचे पिंजरे आदींवरील स्वॅबचे नमुने संशोधकांनी घेतले

  • कोरोना विषाणूच्या संसर्गचे निदान झालेल्या नमुन्यांमध्ये प्राण्यांच्या जनुकीय घटकांचे अंश

  • हे अंश रॅकून श्वानांमध्ये मोठ्या प्रमाणावर सापडलेल्या घटकांशी मिळतेजुळते

आकडेवारी गायब

आंतरराष्ट्रीय पथकाला नव्या वारीचा संदर्भ मिळाला. त्यानंतर चीनच्या संशोधकांशी संपर्क साधण्यात आला. ही आकडेवारी ऑनलाइन माध्यमावर टाकण्यात आली होती आणि संदर्भासाठी सहकार्याचे आश्वासनही चीनकडून देण्यात आले होते. त्यानंतर मात्र ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन शेअरींग एव्हीयन इन्फ्लूएन्झा डाटा गायब करण्यात आला.

विषाणू तसेच प्राण्यांच्या जनुकीय घटकांच्या अभ्यासाच्या आकडेवारीतील गोंधळ बघता रॅकून श्वान विषाणू बाधित होते हे सिद्ध होत नाही असे वृत्तात नमूद करण्यात आले आहे. हे श्वान बाधित असले तरी त्यांच्यापासून माणसांना संसर्ग झाल्याचे स्पष्ट होत नाही, हा मुद्दा सुद्धा अधोरेखित करण्यात आला.