नवाल्नी यांच्यावर विषप्रयोग कसा झाला? सहकार्याने केला मोठा खुलासा

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 17 September 2020

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले अॅलेक्सी नवाल्नी यांच्यावर 'नोविचोक' या सोवियत महासंघाच्या काळातील विषाचा वापर करण्यात आला होता.

मॉस्को- रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले अॅलेक्सी नवाल्नी यांच्यावर 'नोविचोक' या सोवियत महासंघाच्या काळातील विषाचा वापर करण्यात आला होता. विमानातून प्रवास करत असताना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आलं होतं. नवाल्नी यांच्यावर कधी आणि कशाप्रकारे विषाचा प्रयोग करण्यात आला, याबाबत त्यांच्या सहकार्याने मोठा खुलासा केला आहे. नवाल्नी राहत असलेल्या हॉटेलमधील खोलीत एका पाण्याच्या बॉटलवर 'नोविचोक' विष आढळलं असल्याचं त्यांच्या सहकार्याने म्हटलं आहे. 

डिजिटल माध्यमांसाठी नियम गरजेचे; केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयामध्ये शपथपत्र

सर्बिया ते मॉस्कोकडे जाणाऱ्या विमानातून प्रवास करताना नवाल्नी आजारी पडले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जर्मनीमध्ये हलवण्यात आले होते. अँटिबॉडी दिल्या जात असल्याने त्यांना दोन आठवड्यांसाठी कोमात ठेवण्यात आले होते. नवाल्नी यांच्या आईने त्याच्यांवर झालेल्या विषप्रयोगाबाबत पुतीन यांना जबाबदार धरलं आहे. रशियाने मात्र यामध्ये आपला काहीही हात नसल्याचे म्हटलं आहे. 

नवाल्नी आता कोमामधून बाहेर आले असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होताना दिसत आहे. मंगळवारी त्यांनी कुटुंबीयांसोबतचा फोटो पोस्ट केला होता. मी अजूनही पूर्णपणे बरा झालो नाही, पण काल मी कोणत्याही सपोर्टशिवाय श्वास घेऊ शकलो, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं होतं. नवाल्नी यांच्या इन्स्टाग्रामवर गुरुवारी एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. यात नवाल्नी यांच्या टीमने त्यांनी वास्तव केलेल्या खोलीची तपासणी केल्याचं सांगण्यात आलं आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांना लशीची घाई; तज्ज्ञांना ठरविले चूक

नवाल्नी आजारी पडल्यानंतर काही तासांनी त्यांचे सहकारी त्यांच्या हॉटेलमध्ये आले होते. त्यांनी खोलीमधील काही सामान आपल्याजवळ ठेवले. यात एका पाण्याची बॉटलचाही समावेश होता. दोन आठवड्यानंतर जर्मनीच्या लॅबमध्ये करण्यात आलेल्या चाचणीत बॉटलवर 'नोविचोक' विष आढळून आल्याचं सांगण्यात आलंय. नवाल्नी यांच्यावर करण्यात आलेला विषप्रयोग आणि बॉटलवर आढळून आलेले विष एकच असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं. त्यामुळे नवाल्नी आपली खोली सोडण्याआधी त्यांच्यावर विषप्रयोग झाल्याचे स्पष्ट होत आहे.  

'नोविचोक' हे रासायनिक अस्त्र सोवियत महासंघाच्या काळात वापरलं जायचं. याच विषाचा प्रयोग 2018 मध्ये रशियाचे माजी हेर सर्गेई स्क्रिपाल आणि त्यांच्या मुलीवर करण्यात आला होता. दरम्यान, व्लादिमीर पुतीन यांच्या अनेक विरोधकांवर यापूर्वी विषाचा प्रयोग करण्यात आला आहे. त्यामुळे नवाल्नी यांच्यावर पुतीन यांनी विषप्रयोग केला असल्याचा आरोप केला जात आहे. 

(edited by- kartik pujari)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Colleagues of Russian opposition leader Alexei Navalny revealed how he poisoned