संघ आणि 'मुस्लिम ब्रदरहूड'सारखाच : राहुल गांधी

Rahul Gandhi
Rahul Gandhi

लंडन : कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज जर्मनीपाठोपाठ ब्रिटनमध्येही सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वाभाडे काढले. भारताच्या वृत्तीमध्ये बदल करण्याचा संघाचा प्रयत्न असून रा.स्व.संघाची विचारसरणी ही अरब देशांतील "मुस्लिम ब्रदरहूड' सारखी असल्याची टीका त्यांनी केली. येथे "इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीज' या संस्थेमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना राहुल यांनी उपरोक्त मत मांडले. संघ ज्या पद्धतीने भारतातील संस्थांवर हल्ले करतो आहे तसे हल्ले याआधी कोणत्याही पक्षाने केले नसल्याचे ते म्हणाले. 

कॉंग्रेस हा लोकांचा पक्ष असून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ द्वेषाचा प्रसार करत देशाची विभागणी करत असल्याचा गंभीर आरोप कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. येथे परदेशस्थ भारतीयांच्या परिषदेत गुरुवारी रात्री बोलताना राहुल यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपची अक्षरश: पिसे काढली. 

नोटाबंदी, बेरोजगारी, आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याचे केंद्र सरकारने न पाळलेले आश्‍वासन, "राफेल' या लढाऊ विमानांच्या खरेदीतील गैरव्यवहार आदी मुद्दे उपस्थित करत त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. राहुल यांनी या वेळी संसद आणि राज्य विधिमंडळातील महिला आरक्षणाचा मुद्दाही लावून धरला. ""कॉंग्रेसचे कार्यकर्ते हे देशाचे नागरिक असतात, तर भाजपचे कार्यकर्ते केवळ त्यांच्याच पक्षाचे असतात. सर्वांसोबत काम करण्यावर कॉंग्रेसचा विश्‍वास असून भारतातील विद्यमान सरकार मात्र विविध मार्गांनी काम करते आहे. आज भारताची स्पर्धा चीनसोबत आहे. द्वेषाचा आधार घेत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशाचे विभाजन करू पाहतो आहे. कॉंग्रेसचे काम हे देशाला एकत्र करून त्याला प्रगतिपथावर नेणे हे आहे,'' असेही राहुल यांनी नमूद केले. 

"राफेल' करार 
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीकडे 45 हजार कोटी रुपयांचे थकीत कर्ज असून, त्यांच्या कंपनीला संरक्षण साहित्य क्षेत्रातील साधने कशी तयार करायची याचा अनुभव नसतानाही त्यांना "राफेल'च्या निर्मितीचे कंत्राट देण्यात आले. या प्रक्रियेतून "हिंदुस्थान एरोनॉटिक्‍स लिमिटेड' या कंपनीला जाणीवपूर्वक दूर ठेवले जात आहे. याचा परिणाम हा थेट रोजगाराच्या निर्मितीवर होणार असल्याचे राहुल यांनी स्पष्ट केले. 

असंघटित क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून, मोठ्या उद्योगांपेक्षाही अधिक रोजगार या क्षेत्रातून निर्माण होतात. पण विद्यमान सरकार या क्षेत्रालाच नख लावू पाहत आहे. "नोटाबंदी'सारख्या निर्णयाचा या क्षेत्राला खूप मोठा फटका बसला. यामुळे देशाचा "जीडीपी' थेट दोन टक्‍क्‍यांनी कमी झाला आहे. 
- राहुल गांधी, अध्यक्ष कॉंग्रेस 

राहुल यांच्यासाठी शीख समाज केवळ मतपेढी असून, 1984 मधील शीखविरोधी दंगलीप्रकरणी त्यांनी माफी मागावी. राहुले यांचे बर्लिनमधील भाषण "फोडा आणि राज्य करा' या तत्त्वाला अनुसरूनच आहे. 
आर. पी. सिंह, भाजपचे प्रवक्‍ते 

राहुल गांधी यांनी एकदा संघाच्या शाखेवर यावे त्यानंतर त्यांना देशाच्या आत्म्याचे ज्ञान होईल. 
राजीव तुली, प्रवक्‍ते "आरएसएस' 

राहुल गांधी यांचे विचार प्रगल्भ नाहीत, त्यांना भारताबद्दल माहिती नाही, त्यांच्याकडे नेतृत्व गुण नाहीत. राहुल हे पंतप्रधान मोदी, भाजप आणि संघाचा द्वेष करत असून, त्यातूनच ते बेजबाबदार विधाने करत आहोत. 
- संबित पात्रा, भाजपचे प्रवक्ते 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com