ब्राझीलची अमेरिकेच्या दिशेने वाटचाल; कोविड-19 मृतांचा आकडा धडकी भरवणारा

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 9 August 2020

शनिवारी ब्राझीलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1 लाखांच्या पुढे गेली आहे.

रिओ दी जानेरिओ- शनिवारी ब्राझीलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1 लाखांच्या पुढे गेली आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने 30 लाखांचा आकडा पार केला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. ब्राझील कोरोना महामारीने सर्वाधिक प्रभावीत दुसरा देश ठरला आहे. पहिल्या स्थानी अमेरिका कायम आहे.

लष्करप्रमुख वापरतात पर्सनल एअर सॅनिटायझर; एक मीटर हवेतील सूक्ष्मजीवांपासून देतो...

शनिवारी ब्राझीलमध्ये 49,970 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, तर गेल्या 24 तासात 905 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3,012,412 झाली आहे. कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 100,477 पर्यंत पोहोचली आहे. तज्ज्ञांनी ब्राझीलमधील कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी फसवी असल्याचं म्हटलं आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या सहापटीने जास्त असल्याचा दावा करण्यात आला आहे. ब्राझीलमध्ये कोरोना चाचण्या खूप कमी प्रमाणात करण्यात येत आहेत. त्यामुळे खरा आकडा समोर येत नाहीये, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.  

ब्राझीलमध्ये दर 10 लाखांमागे 478 जणांचा मृत्यू होत आहे. अमेरिकेतही 10 लाख लोकांमागे 487 लोकांचा मृत्यू होत आहे. स्पेन (609) आणि इटली (583) या देशांच्या तुलनेत हा आकडा कमी आहे. मात्र, ब्राझीलमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहेत. शिवाय कोरोना विषाणू अनेकांचा बळी घेत आहे. ब्राझिलच्या सिनेटने मृतांची संख्या 1 लाखांच्या पुढे गेल्याच्या पार्श्वभूमीवर सभागृहात श्रद्धांजली वाहिली.

ऐश्वर्याच्या मदतीसाठी आदित्य ठाकरेंनी मध्यरात्री हलविली प्रशासकीय यंत्रणा!

ब्राझीलमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव थांबण्याचं नाव घेत नाहीये. गेल्या सहा महिन्यांपासून देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच गेली आहे. देशात पहिला कोरोनाबाधित रुग्ण 26 फेब्रुवारी रोजी साओ पाओलो शहरात आढळला होता. तसेच 12 मार्च रोजी पहिल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ब्राझीलचे राष्ट्रपती जैर बोलसानारो यांनाही मागील महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. उपचार घेतल्यानंतर त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

दरम्यान, अमेरिका कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित देश ठरला आहे. अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 50 लाखांच्या पुढे गेली आहे. तसेच आतापर्यंत कोरोना विषाणूमुळे 1 लाख 62 हजारांपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलनंतर भारत सर्वाधिक प्रभावित देश ठरला आहे. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 21 लाखांच्या पुढे गेली असून मृतांची संख्या 43 हजारांच्या पुढे गेली आहे. विशेष म्हणजे दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या भारतात सर्वाधिक आहे. 

(edited by-kartik pujari)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the Corona in Brazil The death toll has crossed 1 lakh