esakal | लस घेतल्यास मृत्यूची शक्यता 0.00005 टक्के!

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 8 कोटी 7 लाख लोकांना कोरोनावरील लस देण्यात आली आहे. एकूण लस घेतलेल्यांपैकी 77 जणांचा मृत्यू झाला आहे.

लस घेतल्यास मृत्यूची शक्यता 0.00005 टक्के!
sakal_logo
By
टीम ईसकाळ

वॉशिंग्टन- डिसेंबर महिन्यापासून अमेरिकेत लसीकरण सुरु झाले. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 8 कोटी 7 लाख लोकांना कोरोनावरील लस देण्यात आली आहे. एकूण लस घेतलेल्यांपैकी 77 जणांचा मृत्यू झाला आहे. लसीकरणानंतर मृत्यूचं प्रमाण 0.00005 टक्के इतकं आहे, तसेच लसीकरणानंतर लक्षणं दिसून येण्याचं प्रमाण 0.0005 टक्के आहे. लस घेतल्यानंतर 10 लाख व्यक्तींपैकी केवळ 3 जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलंय. अमेरिकेमध्ये फायझर, जॉन्सन अँड जॉन्सन आणि मॉडर्ना लशीचे डोस दिले जात आहेत.

अमेरिकेत सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातच अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी मोठी घोषणा केलीये. ज्यांनी कोरोनावरील लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना मास्क घालण्याची आवश्यकता नाही, असं त्यांनी जाहीर केलंय. त्यामुळे लसीकरणामुळे अमेरिकेला मोठा फायदा झाल्याचं दिसून येतंय. अमेरिकेत सध्या 25 टक्के लोकांचे लसीकरण झाले आहे. काही निर्बंधही शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे अमेरिका कोरोनामुक्तीच्या दिशेने जात असल्याचं चित्र आहे.

हेही वाचा: कोरोना चाचण्यांचा वेग वाढणार; भारतात आणखी ६ कीट दाखल

कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या अमेरिकी नागरिकांना गर्दीची ठिकाणे वगळता इतर सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याची गरज नाही, असे येथील साथरोग नियंत्रण विभागाने जाहीर केले आहे. तसेच, काही निवडक परिस्थितीत लस घेतली नसेल तरीही मास्क न घालण्याची परवानगी देण्यात आली आहे. जनजीवन सुरळीत करण्याच्या दिशेने अमेरिकी सरकारने टाकलेले हे आणखी एक पाऊल मानले जात आहे. अमेरिकेत गेल्या वर्षभरापासून मास्क घालण्याचा सल्ला लोकांना दिला जात आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने आणि लसीकरणाला वेग येत असल्याने हा निर्णय घेतल्याचे सरकारतर्फे जाहीर करण्यात आले. अमेरिकेत कोरोना साथीत ५ लाख ७० हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा: १ मे पासून लसीकरण सुरू होणार नाही- राजेश टोपे

लसीकरणाचे अमेरिकेत अनेक सराकात्मक परिणाम दिसून येत आहेत. दोन लशींचे डोस घेतल्यांना मास्कपासून मुक्ती देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे देशात आणखी लसीकरण वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकेतच नाही तर इतर युरोपीयन देशांमध्ये लसीकरणाचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. भारतात 1 मेपासून 18 वर्षांपुढील सर्वांना लस मिळण्यास सुरुवात होईल. त्यामुळे भारतातही याचे अनुकूल परिणाम दिसण्याची आशा आहे.