esakal | कोरोनाचा उद्रेक तरीही भारताने संयुक्त राष्ट्राची मदत नाकारली

बोलून बातमी शोधा

कोरोनाचा उद्रेक तरीही भारताने संयुक्त राष्ट्राची मदत नाकारली

देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. सलग दुसऱ्या दिवशी भारतात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा हा 3 हजारांच्या वर आहे.

कोरोनाचा उद्रेक तरीही भारताने संयुक्त राष्ट्राची मदत नाकारली
sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

जिनिव्हा - देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. सलग दुसऱ्या दिवशी भारतात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा हा 3 हजारांच्या वर आहे. अशा परिस्थिती जगातील अनेक देशांकडून वैद्यकीय मदतीचा पुरवठा केला जात आहे. यात संयुक्त राष्ट्राने सुद्धा भारताला मदत करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र भारताकडून ही मदत नाकारण्यात आल्याचं समोर आलं आहे. याची माहिती संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रमुख गुटेरस यांचे उपप्रवक्ते फरहान हक यांनी पीटीआयशी बोलताना दिली. भारताने जगातील काही देशांना कोरोना प्रतिबंधक लस देऊन मदत केली होती. त्याची जाण ठेवून अनेक देशांनी भारताला इतर वैद्यकीय साधनांची मदत कऱण्यास सुरुवात केली आहे.

कोरोनाची लस जगातील देशांमध्ये पोहोचवणं शक्य नव्हतं तेव्हा भारतानं लसीकरणासाठी मोठी मदत केली होती. त्यामुळे आता इतर देशांनी भारताला मदत करण्याची वेळ आली असल्याचं गुटेरस यांनी म्हटलं होतं. पण भारताने आता ही मदत घेण्यास नकार दिल्याचं हक यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले की, आम्ही कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक साधनांचा पुरवठा कऱण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र भारतात याची गरज नाही. याठिकाणी आधीच भक्कम अशी यंत्रणा काम करत असल्याचं उत्तर मिळालं. तरीही आम्ही मदतीसाठी तयार असून आमचा प्रस्ताव अजुनही कायम असल्याचं हक यांनी म्हटलं.

हेही वाचा: अमेरिकेतील भारतीयांकडून ४७ लाख डॉलरचा निधी

संयुक्त राष्ट्र भारताला आवश्यक साहित्य पुरवणार का यावर बोलताना हक यांनी सांगितलं की, अद्याप असं काही ठरलेलं नाही. मात्र आम्ही अशा मदतीसाठी तयार आहे. भारतातील संयुक्त राष्ट्राच्या लोकांशी संपर्कात आहे. गरज पडली तर आम्ही मदत करू. भारतातील संकट वाढलं असून आम्ही त्याचा आढावा घेत आहे.

भारतात कोरोनाचा उद्रेक

भारतात गुरुवारी दिवसभरात 3 लाख 79 हजार 257 कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर गेल्या 24 तासात 3 हजार 645 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. एका दिवसात तब्बल 2 लाख 69 हजार जण कोरोनामुक्त झाले. देशात लसीकरण मोहिम सुरु असून आतापर्यंत 15 कोटी 20 हजार 648 जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.