esakal | लठ्ठपणा आणि कोरोना; 'लॅन्सेट'मध्ये खळबळजनक दावा

बोलून बातमी शोधा

obesity

लठ्ठपणा आणि कोरोना; 'लॅन्सेट'मध्ये खळबळजनक दावा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली- जास्त वजन अथवा स्थूल असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो, असे मत ‘द लॅन्सेट डायबेटिक अँड एंडोक्रिनोलॉजी’ या विज्ञानविषयक नियतकालिकाने नोंदविले आहे. हे नियतकालिक गुरुवारी (ता.२९) प्रसिद्ध झाले. कोरोनाच्या संसर्गासाठी शारीरिक वजन कारणीभूत ठरते का याचा अभ्यास बॉडी-मास इंडेक्स (बीएमआय) च्या मदतीने करण्‍याचा हा पहिलाच प्रयत्न आहे, असा दावा ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. शरीरातील चरबी मोजण्याचे ‘बीएमआय’ हे एक मोजमाप आहे, जे एखाद्या व्यक्तीच्या उंची आणि वजनाच्या आधारावर मोजले जाते. इंग्लंडमध्ये राहणाऱ्या ६९ लाखांपेक्षा अधिक लोकांची पाहणी करून आणि कोरोनाच्या पहिल्या लाटेत बाधित झालेले किंवा मृत्यू पावलेल्या २० हजार जणांच्या माहितीच्या आधारे हे संशोधन करण्यात आले आहे.

संशोधकांच्या निरीक्षणानुसार २३ किलोग्रॅम प्रति वर्ग मीटर ‘बीएमआय’ (जी निरोगी श्रेणी समजली जाते)पेक्षा अधिक असलेल्या व्यक्तींसाठी कोरोना संसर्गाचा धोका जास्त असतो. या सामान्य श्रेणीपेक्षा वाढणाऱ्या प्रत्येक एक युनिटमागे रुग्णालयात दाखल करण्याचा धोका पाच टक्के असतो तर ‘आयसीयू’मध्ये ठेवण्याची वेळ येण्याची शक्यता दहा टक्के असते, असे अहवालात नमूद केले आहे.

हेही वाचा: लसीकरण केंद्र की कोरोना स्प्रेडर सेंटर? नागरिक तासन्‌तास रांगेतच

ज्या लोकांचे वजन कमी असते म्हणजेच ज्यांचे ‘बीएमआय’ १८. ५ पेक्षा कमी आहे, त्यांनाही कोरोना होण्याची धोका निर्माण होऊ शकतो. स्थूलत्वामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका २० ते ३९ वर्षे या वयोगटातील युवा वर्गाला असतो. वयाच्या साठीनंतर हा धोका कमी होते, तर ‘बीएमआय’मधील वाढीने कोरोनाचा होण्याचे प्रमाण ८० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तिंमध्ये अत्यल्प असते, अशी नोंदही अहवालात आहे. मात्र २० ते ३९ या वयोगटातील तरुणांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण अन्य वयोगटांपेक्षा कमी आहे, हेही लक्षात घेतले पाहिजे, असे संशोधकांनी म्हटले आहे.

अहवालातील अन्य निरीक्षणे

- लसीकरणाचे धोरणात लठ्ठ व्यक्तींना प्राधान्य द्यावे

- युवा वर्गासाठी लसीकरण सुरू करणे आवश्‍यक

- वजन कमी केल्यास कोरोनाचा धोका कमी होतो का, याची खात्री देता येत नसली तरी सकारात्मक परिणामांची आशा