esakal | लसीकरण केंद्र की कोरोना स्प्रेडर सेंटर? नागरिक तासन्‌तास रांगेतच

बोलून बातमी शोधा

vaccination
लसीकरण केंद्र की कोरोना स्प्रेडर सेंटर? नागरिक तासन्‌तास रांगेतच
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : वाढत्या रुग्णसंख्येसोबतच अपुरे लसीकरण प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. सध्या लसीकरण केंद्रांवर उसळणारी गर्दी पाहता हे केंद्र आहे की कोरोना स्प्रेडर सेंटर, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. बहुतेक सर्व लसीकरण केंद्रांवर सोशल डिस्टंन्सिंगचा पुरता फज्जा उडालेला असून लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून अनेकांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती आता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: निवडणुकीच्या काळात हात जोडून मतं मागणारे लोकप्रतिनिधी कोरोनाकाळात गेले कुठे? नागरिकांचा सवाल

जिल्ह्यातील 135 लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये शासकीय तसेच खासगी केंद्रांचाही समावेश आहे. सुरुवातीला लस घेण्यास फारसे उत्सुक नसलेल्या नागरिकांनी मात्र आता लसीचे महत्त्व जाणून लसीकरण केंद्रांवर एकच गर्दी सुरू केली आहे. पहाटे सहापासूनच रांगा लावण्यात येत असून अपवाद वगळता बसण्याची किंवा कडाक्‍याच्या उन्हापासून संरक्षणाची कुठलीही व्यवस्था केंद्रांवर दिसत नाही. रांगेत उभे असलेल्या नागरिकांमध्ये कुठल्याही प्रकारे सोशल डिस्टन्सिंग दिसून येत नाही. अनेकजण तर मास्क नाकाखाली घेऊन चर्चा करतात. सध्या लसीकरण केंद्रांवर 45 वर्षांवरील तसेच ज्येष्ठ नागरिकांची गर्दी झालेली आहे. जवळपास सर्वच लसीकरण केंद्र गर्दीने फुलून गेली आहेत. रांगेत तासन्‌तास उभे असतानाही सोशल डिस्टन्सिंगची कुठलीही व्यवस्था याठिकाणी नसल्याने अनेकांना ते सहन करावे लागते. पयार्याने लसीकरण केंद्र कोरोनाचे सुपर स्प्रेडर बनण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पुढारी झालेत बेपत्ता -

एरवी कुठल्याही मुद्यावर आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधणारे पुढारी सध्या गायब झाले आहेत. सर्वसामान्य नागरिक विशेषतः ज्येष्ठ नागरिक सकाळपासूनच उन्हातान्हात आपला नंबर केव्हा येणार, याची वाट पाहत असतात. अनेकांकडे पिण्याचे पाणीसुद्धा नसते. शिवाय लसीकरण होणार की नाही, याचाही पत्ता नसतो. अशा अडचणींच्या वेळी कुणीतरी आपल्यासाठी आवाज उठवावा, अशी माफक अपेक्षा नागरिकांची असते. मात्र, सद्या पुढारी बेपत्ता झाल्याचेच दिसून येत आहे.