कोरोनाच्या तापाने फणफणला ड्रॅगन

पीटीआय
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

जागतिक उत्पन्नाला फटका
कोरोनामुळे १९१८ मधील स्पॅनिश फ्लूच्या आठवणी जाग्या झाल्या असून, त्यामध्ये तीन कोटी लोकांचा बळी गेला होता. आता कोरोनाच्या विषाणूंनी तो टप्पा गाठला तर जागतिक उत्पन्नावर एक ते दहा टक्‍क्‍यांपर्यंत परिणाम होऊ शकतो, असे बॅंकेचे अध्यक्ष जिम योंग कीम यांनी आधीच सांगितले आहे. या विषाणूंच्या प्रसारानंतर चिनी कम्युनिस्ट पक्ष खडबडून जागा झाला असून, पक्षाचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शी जिनपिंग यांनी सोमवारी झालेल्या पॉलिट ब्युरोच्या बैठकीत परिस्थितीचा आढावा घेतला. 

कॅसिनो बंद
कोरोनाच्या भीतीमुळे मकाऊमधील सर्व कॅसिनो तात्पुरते बंद करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. येथे दहा जणांना या विषाणूची लागण झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर तेथील सरकार खडबडून जागे झाले आहे. येथील सर्व अर्थकारण हे कॅसिनो उद्योगाशी जोडल्या गेलेले असल्याने आता तेच बंद पडल्यामुळे स्थानिकांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. जपान सरकारनेही या विषाणूंच्या भीतीपोटी जहाजांवरील तीन हजार सातशे अकरा जणांना तपासणीसाठी वेगळे केले आहे. योकोहोमा बंदरावर सोमवारी जहाजांमधून आलेल्या आठ प्रवाशांमध्ये कोरोनासदृश लक्षणे आढळून आल्यानंतर जपान सरकारने हा निर्णय घेतला आहे.

बीजिंग - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे चिनी ड्रॅगन चांगलाच फणफणला आहे. चीनमध्ये या विषाणूने आतापर्यंत ४२५ जणांचा बळी घेतला असून, २० हजार ४३८ इतक्‍या लोकांना याची लागणी झाली आहे. सोमवारी दिवसभरामध्ये ६४ जण मरण पावले असून, ३ हजार २३५ जणांना नव्याने विषाणूचा संसर्ग झाल्याचे चीनच्या आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले. ‘कोरोना’चा मोठा फटका जागतिक अर्थकारणालादेखील बसण्याची शक्‍यता लक्षात घेऊन जागतिक बॅंकेने या विषाणूविरोधात सर्वच देशांनी एकवटण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भविष्यातील या आजाराचा उद्रेक टाळण्यासाठी सर्वच देशांनी त्यांच्या आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याची आवश्‍यकता असल्याचे जागतिक बॅंकेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. या विषाणूमुळे प्रभावित झालेल्या देशांना तातडीने आर्थिक आणि तांत्रिक मदत पुरविण्यासाठी जागतिक बॅंकेने पुढाकार घेतला असून, आंतरराष्ट्रीय भागिदारांसोबत समन्वय ठेवून यावर मार्ग शोधला जात आहे. याआधी २००२ ते २००३ या वर्षीदेखील ‘सार्स’च्या विषाणूने असाच धुमाकूळ घालत जगभरामध्ये आठशे लोकांचे प्राण घेतले होते. आता कोरोना विषाणूने वीस देशांमध्ये हातपाय पसरले असून, यामुळे आशियातील आर्थिक महासत्ता असलेल्या चीनचे कंबरडे मोडू शकते. 

व्हिडिओ पाहून डोळ्यात येतं फक्त पाणीच...

जागतिक अर्थकारणावरदेखील याचा परिणाम होणे अपरिहार्य असल्याचे जागतिक बॅंकेने म्हटले आहे.

चीन आणि जगामध्ये कोरोनाचा विषाणू आज ज्या वेगाने पसरतो आहे, हे लक्षात घेता पुढील दहा ते चौदा दिवसांमध्ये त्याचा वेग आणखी वाढू शकतो. पुढील दोन आठवड्यांमध्ये या विषाणूंचा अधिक वेगाने प्रसार होणार आहे.
- झोंग नानशान, चीनमधील आरोग्यतज्ज्ञ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona virus increase in bijing