सार्सपेक्षाही कोरोना उग्र

पीटीआय
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

चीनमधील कोरोना विषाणूच्या संसर्गाने आता ‘सार्स’पेक्षाही अक्राळविक्राळ रूप धारण केले असून, मृतांची संख्या ८१३ वर पोचली आहे. याआधी २००३ मध्ये चीनमध्ये अशाच पद्धतीने सार्सचा प्रसार झाला होता.

चीनमधील मृतांची संख्या आठशेवर; जगभरातील प्रसार सुरूच
बीजिंग - चीनमधील कोरोना विषाणूच्या संसर्गाने आता ‘सार्स’पेक्षाही अक्राळविक्राळ रूप धारण केले असून, मृतांची संख्या ८१३ वर पोचली आहे. याआधी २००३ मध्ये चीनमध्ये अशाच पद्धतीने सार्सचा प्रसार झाला होता. सार्सच्या साथीपेक्षाही कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांची संख्या अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाच्या प्रसाराचे केंद्रस्थान बनलेल्या एकट्या हुबई प्रांतामध्ये ७८० लोकांचा मृत्यू झाला असून, चीनच्या अन्य राज्यांमध्येही यामुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला असल्याचे बोलले जाते. यापूर्वी २००३ मध्ये अशाच पद्धतीने सार्सचादेखील प्रसार झाला होता तेव्हाही बारापेक्षाही अधिक देशांतील ७७४ लोकांना प्राण गमवावे लागले होते. जगभरातील कोरोना विषाणूंची लागण झालेल्यांची संख्या मात्र ३४ हजार ८००  च्याही पुढे गेली आहे.

यूएईमध्येही कोरोनाचा विषाणू
संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) दोघांना कोरोनाच्या विषाणूंची लागण झाल्याचे उघड झाले आहे. तेथील आरोग्य मंत्रालयाकडूनच ही माहिती देण्यात आली. नव्याने कोरोना विषाणूंची लोकांना लागण झाल्यास आरोग्य यंत्रणा याची तातडीने नोंद घेईल, असे तेथील सरकारने म्हटले.

दरम्यान, कोरोनाच्या संसर्गाचा मोठा फटका सिंगापूरमधील एअर शोला बसला असून, या शोमधून जवळपास सत्तर कंपन्यांनी माघार घेतली आहे. यामध्ये अमेरिकेतील लॉकहीड मार्टिनप्रमाणेच बारा चिनी कंपन्यांचाही समावेश आहे. या एअरशोला मंगळवारपासून सुरवात होणार आहे. आयोजकांनीही खबरदारीचा उपाय म्हणून सर्वसामान्यांना कमी तिकिटे देण्याचा निर्णय घेतला आहे. आता या शोमध्ये केवळ ९३० कंपन्या आणि ४५ हजार व्यापार प्रतिनिधी सहभागी होऊ शकतील.

चिनी शिष्टमंडळाला लाल कंदील
पणजी : कोरोनाच्या विषाणूचा वेगाने होणारा फैलाव लक्षात घेता भारत सरकारदेखील सावध झाले आहे. परदेशी पर्यटकांचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोव्यामध्येही आता कठोर उपाययोजना आखल्या जात आहेत. या विषाणूंचा धोका लक्षात घेऊन गोवा सरकारने चिनी शिष्टमंडळाचा दौरा तात्पुरता पुढे ढकलला आहे. छायाचित्रकार, महिला मॉडेल्स, मार्केटिंगतज्ज्ञ यांचा समावेश असलेले हे शिष्टमंडळ आज गोव्यामध्ये येणे अपेक्षित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona virus infection in China now takes on more form than SARS