चीनमध्ये बळींची संख्या २६०० वर; दक्षिण कोरियात ६० नवे रुग्ण

पीटीआय
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूच्या संसर्गाचे संकट कायम आहे.

बीजिंग - गेल्या अडीच महिन्यांपासून चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूच्या संसर्गाचे संकट कायम आहे. गेल्या चोवीस तासांत चीनमध्ये कोरोनाचे ७१ बळी गेले असून, मृतांची संख्या एकूण २६६३ वर पोचली आहे. आत्तापर्यंत चीनमध्ये ७७,६५८ जणांना कोरोनाची बाधा झाली असून, जगभरातील आकडा हा ८० हजारांवर गेला आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने कोरोनाचे ५०८ नवीन रुग्ण आढळून आल्याचे म्हटले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलो करा ई-सकाळचे ऍप 

चीनमध्ये ७१ पैकी ६८ जणांचा मृत्यू हा हुबेई प्रांतात झाला असून, शानडोंग येथे दोन, गुआंगदोंग येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. कोरोना व्हायरसची तीव्रता कमी होत असल्याचा दावा राष्ट्रीय आरोग्य आयोगाने केला आहे. शिंजुआने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी २,५८९ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. ही संख्या नव्याने आढळून आलेल्या संख्येपेक्षा कितीतरी अधिक आहे, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. रविवारपर्यंत एकूण २७,३२३ बाधित रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. सलग सहाव्या दिवशीही नव्या रुग्णांची संख्या हजाराच्या आतच राहिल्याने आरोग्य विभागाने समाधान व्यक्त केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अभियानाचे प्रमुख ब्रुस एलवर्ड यांनी चीनकडून होणाऱ्या प्रयत्नांचे फळ म्हणून नवीन रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे म्हटले आहे. चीनमध्ये कोरोना व्हायरस हा धोकादायक स्थितीवर पोचला होता. मात्र, आता काही दिवसांपासून त्यात घसरण होत आहे, असे मत एलवर्ड यांनी व्यक्त केले. 

दक्षिण कोरियात नवीन ६० रुग्ण 
सोल : चीनमध्ये कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असताना दक्षिण कोरियात मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. गेल्या चोवीस तासांत कोरियात ६० नवीन रुग्ण आढळून आले असून, आत्तापर्यंत ८९३ जणांना बाधा झाली आहे. त्याचवेळी मृतांची संख्या चारवर पोचली आहे. दक्षिण कोरियातील दाएगू शहरात सर्वाधिक ४९ जण कोरोनाबाधित झाले आहेत. जपानमध्ये ८५० हून अधिक नागरिकांना बाधा झाली असून, त्यात योकोहामाच्या किनाऱ्यावर असलेल्या डायमंड प्रिन्सेस जहाजावरील ६९१ जणांचा समावेश आहे. 

अडीच अब्ज डॉलर खर्चाची मागणी 
वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी व्हॉइट हाउससुमारे अडीच अब्ज डॉलरची तरतूद करण्याचा विचार करत आहे. ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने दिलेल्या वृत्तानुसार ट्रम्प प्रशासनाने कॉंग्रेसला केलेल्या विनंतीत आपत्कालीन निधीतून १.८ अब्ज डॉलर खर्च करण्याची परवानगी मिळावी, असे म्हटले आहे. 

इराणमध्ये तिघांचा मृत्यू 
तेहरान : कोरोना व्हायरसमुळे इराणमध्ये तीन जणांचे बळी गेले असून, त्यामुळे मृतांची संख्या १५ वर पोचली आहे. इराणमध्ये आत्तापर्यंत ६० हून नागरिकांना बाधा झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona virus infection persisted