
दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारामुळे संसर्ग अधिक प्रमाणात फैलावत असल्याचा दावा येथील सरकारने केला आहे.
जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारामुळे संसर्ग अधिक प्रमाणात फैलावत असल्याचा दावा येथील सरकारने केला आहे. ‘501. व्ही 2’ असे या विषाणूच्या नव्या प्रकाराचे नाव असून दक्षिण आफ्रिकेत नव्याने आढळणाऱ्या रुग्णांमध्ये तो आढळून येत असल्याचे येथील डॉक्टर आणि शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.
दक्षिण आफ्रिकेत कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. प्राथमिक माहितीनुसार, संसर्गाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा अधिक वेगाने पसरत असून ती अधिक प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. विषाणूच्या नव्या प्रकाराचा हा परिणाम आहे, असे सरकारच्या सल्लागार मंडळाचे अध्यक्ष प्रा. सलीम अब्दुल करीम यांनी पत्रकारांना सांगितले.
हे वाचा - ब्रिटनमध्ये नव्या कोरोना विषाणूची धास्ती; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बोलवली बैठक
दुसऱ्या लाटेत अधिक प्रमाणात रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. देशात सध्या साडे आठ हजार जणांवर उपचार सुरु आहेत. देशात दुसऱ्या लाटेची ही सुरुवात असली आणि नव्या विषाणूच्या प्रभावाची माहिती प्राथमिक निष्कर्षावर अवलंबून असली तरी आतापासूनच उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे प्रा. करीम यांनी सांगितले.
ब्रिटनमधील विषाणूपेक्षा वेगळा
दक्षिण आफ्रिकेतील हा नवा विषाणू प्रकार ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या प्रकारापेक्षा वेगळा आहे. दक्षिण आफ्रिकेतील हा प्रकारही कोरोनाच्या मूळ विषाणूपेक्षा अधिक घातक असून विकसीत झालेल्या लशी यावरही परिणामकारक आहेत का, याचा अभ्यास केला जात आहे.
हे वाचा - Covid-19 संदर्भातील सत्य लपवण्यासाठी चीनने ट्रोलर्संसाठी मोजले पैसे
पुन्हा निर्बंध
संसर्ग वाढीमुळे दक्षिण आफ्रिकेत नव्याने निर्बंध लागू करण्यात आले आहेत. देशातील समुद्र किनारे पर्यटकांसाठी बंद करण्यात आले असून व्यापारासाठी दिवस आणि वेळ निश्चित करण्यात आली आहे. गेल्या दोन आठवड्यांमध्ये या देशात सरासरी नव्या रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. संसर्गामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे.