जगभरातील कोरोना रुग्ण अडीच कोटींवर; भारत ब्राझिलला मागे टाकण्याच्या दिशेने

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 30 August 2020

जगभरात कोरोनाचा प्रसार सुरूच असून आत्तापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता अडीच कोटींवर गेली आहे.

वॉशिंग्टन- जगभरात कोरोनाचा प्रसार सुरूच असून आत्तापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता अडीच कोटींवर गेली आहे. अमेरिकेतील जॉन हाफकिन्स विद्यापीठाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. 

जगभरात अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक ६० लाख रुग्ण असून त्यानंतर ब्राझील (३८लाख) व भारताचा (३५लाख) क्रमांक लागतो. कोरोनामुळे अमेरिकेतच सर्वाधिक ८ लाख ४२ हजार मृत्यू झाले आहेत. कोरोनाच्या चाचण्यांना मर्यादा असल्याने प्रत्यक्षातील रुग्ण यापेक्षा कितीतरी पटीने अधिक असल्याचा अमेरिकेतील आपत्ती नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राचा दावा आहे. लक्षणे नसणाऱ्या किंवा सौम्य लक्षणे असणाऱ्या अनेक रुग्णांची नोंद झालेली नाही. त्यामुळेही कोरोनाचे प्रत्यक्षातील रुग्ण खूप अधिक असण्याची शक्यताही या केंद्राने वर्तविली आहे. चीनमधून उगम पावलेल्या कोरोना विषाणूने पाहतापाहता जग कवेत घेतले. 

सर्वाधिक मृत्यूचे देश 

१. अमेरिका -१, ८२,७७९ 

२. ब्राझील - १,२०,२६२ 

३.मेक्सिको - ६३,८१९

एकाच दिवसात १० लाख चाचण्या 

भारताने एकाच दिवसांत १० लाख ५० हजार कोरोना चाचण्या घेण्याचा विक्रम केला असून देशात आतापर्यंत चार कोटी १४ लाखांहून अधिक जणांची कोरोना चाचणी घेण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज जाहीर केले. 

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारताची चाचणी करण्याची क्षमता प्रचंड वाढली आहे. आज भारतात दर दहा लाखांमागे ३०,०४४ जणांची चाचणी घेण्यापर्यंत देशाने मजल मारली आहे. शनिवारी एकाच दिवसात देशात १० लाख ५५ हजार २७ जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. तसेच, भारताने चाचण्यांचे विश्‍लेषण करण्याचीही क्षमता वाढविली असून दररोज दहा लाखांहून अधिक चाचण्यांचा निष्कर्ष काढला जात आहे. कोरोना संदर्भातील जागतिक धोरणाशी सुसंगत राहत भारताने ‘टेस्ट, ट्रॅक, ट्रीट’ हे धोरण आखले असून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांबरोबर समन्वयाने काम सुरु आहे. चाचण्यांवर अधिक भर दिला असल्याने कोरोनाबाधित रुग्णांची लवकर ओळख पटून त्यांच्यावर तातडीने उपचार होत आहेत, असेही आरोग्य मंत्रालयाने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona virus update Over two and a half crore corona patients worldwide