अमेरिकेनंतर ब्राझील बनतोय कोरोनाचा हॉटस्पॉट; मृतांची संख्या झाली एवढी

वृत्तसंस्था
Monday, 22 June 2020

अमेरिकेनंतर ब्राझील हे कोरोनाचा हॉटस्पॉट देश बनत असल्याचे दिसत आहे. ब्राझीलमध्ये कोरोनाच्या बळींची संख्या आता ५० हजारांच्या वर गेली आहे.

ब्राझिलिया : कोरोनाने संपूर्ण जगाला हादरवलेले असताना काही देशात मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव हा खूप मोठ्या प्रमाणात आहे. अमेरिकेनंतर ब्राझील हे कोरोनाचा हॉटस्पॉट देश बनत असल्याचे दिसत आहे. ब्राझीलमध्ये कोरोनाच्या बळींची संख्या आता ५० हजारांच्या वर गेली आहे. अमेरिकेत कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या एक लाखांच्यापुढे गेली असतानाच ब्राझिलची परिस्थिती चिंताजनक बनली आहे. ब्राझिलमध्ये कोरोनाचं थैमान अजूनही कमी झालेलं नाही. अमेरिकेत एक लाख २२ हजार करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

अमेरिकेनंतर ब्राझिलमध्ये सर्वाधिक कोरोना महामारीचा प्रादुर्भाव झाला आहे. मागील २४ तासांत ब्राझिलमध्ये एकूण १०२२ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ब्राझिलमध्ये आतापर्यंत ५० हजार ६२९ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याबाबत एएनआयने अधिकृत वृत्त दिले आहे. गेल्या २४ तासांत ब्राझिलमध्ये ३४ हजार नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता १० लाख ९० हजार झाली आहे.

दरम्यान, भारतातही कोरोनाच्या रुग्णांचा नवा उच्चांक काल (ता. २१) रविवारी नोंदविण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत भारतात कोरोनाचे १५ हजार ४१३ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आठ दिवसांपूर्वी तीन लाखांचा टप्पा ओलांडणाऱ्या भारतातील रुग्णसंख्या आता ४ लाख १० हजार ४६१ झाली आहे. असे असले तरी एक दिलासादायक बाब म्हणजे भारतात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ५५.४९ टक्क्यांवर पोहोचले आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या भारतात आता २ लाख २७ हजार ७५५ झाली असून, गेल्या २४ तासांमध्ये १३ हजार ९२५ रुग्ण बरे झाले आहेत. देशभरात आता एक लाख ६९ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे भारतात आतापर्यंत १३ हजार २५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांमध्ये ३०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील मृतांचे प्रमाण ३.२ टक्के असून २४ तासांमध्ये भारतात १ लाख ९० हजार ७३० चाचण्या घेण्यात आल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus: Brazil becomes second country to pass 50,000 deaths