लॉकडाउननंतर या देशात सुरू झाली थिएटर्स; पण अशी!

वृत्तसंस्था
Wednesday, 6 May 2020

पार्किंगमध्ये कार एका रांगेत उभ्या करण्यात येतात.एका स्क्रीनवर चित्रपट प्ले केला जातो.कारमधील एफएमच्या माध्यमातून स्क्रीनवरील प्लेची ध्वनीफित ऐकत लोक मनोरंजनाचा आनंद घेत आहेत.

तेहरान - जगभरात कोरोना विषाणूने घातलेल्या थैमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोणतीही लस उपलब्ध नसणाऱ्या जागतिक साथीच्या रोगाला थोपवण्यासाठी अनेक राष्ट्रांना लॉकडाऊनसारखे कठोर पाऊल उचलले आहे. जगभरात सोशल डिस्टनसिंगच्या माध्यमातून कोरोनाविरोधोतील लढा सुरु आहे. जीवाची बाजी पणाला लागल्यामुळे विरंगुळा म्हणून मनोरंजनाचे दरवाजेही बंद झाले आहेत. चित्रपट थियटर्स, खेळाची मैदाने टाळेबंद आहेत. घरकोंडीमध्ये मोबाईल-टीव्ही शिवाय विरंगुळ्यासाठी अन्य कोणत्याही माध्यमाची अंमलबजावणी होणे अशक्य झाले असताना इराणमध्ये अनोखा फंडा आजमावल्याचे पाहायला मिळाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इस्लाम क्रांतीनंतर जवळपास 41 वर्षानंतर पहिल्यांदाच इराणमधील कपलने 'ड्राइव्ह इन थिअटर्स'च्या अनोख्या माध्यमातून चित्रपटांचा आनंद घेतल्याचे पाहायला मिळाले. कोरोनाच्या संकटजन्य परिस्थितीचा सामना करत असताना इराणमध्ये एकत्रित चित्रपट पाहण्याची खास सोय करण्यात आली आहे. तेहरान येथील प्रसिद्ध मीलाद टॉवरच्या पार्किंगमध्ये जोडपी आपल्या कारमध्ये बसून चित्रपटाचा आनंद घेऊ शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मीलाद टॉवरच्या पार्किंगमध्ये ऑनलाईन तिकीट खरेदी करुन चित्रपट पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पार्किंगमध्ये कार एका रांगेत उभ्या करण्यात येतात. एका स्क्रीनवर चित्रपट प्ले केला जातो. कारमधील एफएमच्या माध्यमातून स्क्रीनवरील प्लेची ध्वनीफित ऐकत सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत लोक मनोरंजनाच्या या व्यासपीठाचा आनंद घेत आहेत. जगभरातील मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भात असलेल्या राष्ट्रांमध्ये इराणचाही समावेश आहे. याठिकाणी जवळपास 98 हजार 600 लोकांना कोरोनाची लागण झाली असून 6 हजार 200 हून अधिक लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.

चीनच्या वुहानमधून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूने अनेक राष्ट्रांचा वेग मंदावला आहे. भारतासह अमेरिका आणि युरोपातील राष्ट्रांत लॉकडाऊनची परिस्थिती आहे. व्यवसाय-उद्योगधंदे, कारखाने, खेळाची मैदाने सर्व ओस पडले आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य कोणत्याही गोष्टींचा आनंद मनमुराद घेणे शक्य नाही. ही परिस्थिती आणखी किती दिवस राहणार याचा अंदाज घेणे खूप कठिण आहे. संयम आणि धीर बाळगत जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमावलीनुसार सोशल डिस्टन्सिंगचा फॉर्मुला हाच सध्याच्या घडीला जीवनदायी मंत्र आहे. परिस्थिती पूर्ववत होण्यापूर्वी इराणमध्ये अनोख्या पद्धतीने लोकांच्या मनोरंजनाची सोय करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. लॉकडाऊनमधील कोंडमारा झालेल्यासाठी हा अनुभव खास असा नक्कीच असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus Outbreak lockdown iran theater now operates from a parking lot right under Tehrans iconic Milad tower