जगात कोठे काय घडले? जाणून घ्या एका क्लिकवर

Corona-in-World
Corona-in-World

पॅरिस - जगभरातील कोरोना बाधितांची संख्या सात लाखांवर गेली असून मृतांची संख्या पस्तीस हजारांपर्यंत गेली आहे. कोरोनाने आत्तापर्यंत  १८३ देशांमध्ये हातपाय पसरले आहेत. अनेक देशांमध्ये कोरोनाबाबत चाचणी करण्याची सुविधा नसल्याने किंवा अद्याप तपासणीचे काम सुरु असल्याने येत्या काही दिवसांत बाधितांची संख्या वाढण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

कोरोनाचे केंद्र असलेल्या इटलीमध्ये आणि स्पेनमध्येही परिस्थिती ‘जैसे थे’ असून रुग्णसंख्या वाढतेच आहे. इटलीचे बेट असलेल्या सिसीलीमध्ये काही ठिकाणी दुकानांमध्ये लुटालूट होण्याचे प्रकार आज घडले. येथे अनेकांचा रोजगार गेल्याने त्यांच्याकडे पैशांची कमतरता निर्माण झाली आहे. चीन आणि युरोपनंतर सर्वाधिक फटका बसलेल्या इराणमध्येही मृतांच्या संख्येने अडीच हजारांचा पल्ला गाठला आहे. लॉकडाउनमुळे देशाचे सर्व व्यवहार ठप्प झाल्याने नागरिक घरात अडकून पडले आहेत. 

‘इंडिया ॲब्रॉड’ची छपाई थांबविली
न्यूयॉर्क -
 गेल्या पन्नास वर्षांपासून अमेरिकेतील भारतीयांना भारतातील ताज्या घडामोडींची माहिती देणाऱ्या ‘इंडियन ॲब्रॉड’ या वृत्तपत्राने आपली छपाई बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हे वृत्तपत्र आता केवळ ऑनलाइन उपलब्ध असणार आहे. येथील वृत्तपत्र व्यवसाय इंटरनेट आवृत्त्यांमुळे धोक्यात आला असून त्यातच कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे उद्योग बंद पडल्याचा फटका या वृत्तपत्राला बसला आहे. या वृत्तपत्राला जाहिराती मिळेनाशा झाल्या आहेत. भारतीय वंशाचे प्रकाशक गोपाल राजू यांनी १९७० मध्ये या वृत्तपत्राला सुरुवात केली होती. भारतातील बातम्यांना प्राधान्य दिले जात असल्याने हे वृत्तपत्र अनिवासी भारतीयांमध्ये लोकप्रिय आहे.  

वुहानमध्ये दुकाने सुरू
वुहान -
 हुबेई प्रांतातील वाहतूक निर्बंध उठवून चीन सरकारने वुहान शहरातील व्यवहार नेहमीप्रमाणे सुरु करण्याचा आदेश दिल्यानंतर आज येथील ७० ते ८० टक्के दुकाने उघडली. गेले दोन महिने घरात बंद असूनही नागरिकांनी मात्र मर्यादित प्रतिसाद दिला. अनेक दुकानांमध्ये अद्यापही मर्यादित लोकांनाच प्रवेश दिला जात असून प्रवेश देतानाही तापमान चाचणी घेतली जात आहे. 

लॉकडाउनची मर्यादा वाढविणार
रोम -
 इटलीमध्ये संसर्ग आटोक्यात येण्याची अद्याप कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने येथील सरकार लॉकडाउनची कालमर्यादा आणखी एक महिना वाढविण्याचा विचार करत आहे. या देशातील मृतांची संख्या अकरा हजारच्या जवळ येऊन ठेपली असून बाधितांची संख्याही एक लाखांपर्यंत गेली आहे. इटलीमध्ये गेल्या चोवीस तासांमध्ये ७५६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये लॉकडाउनमुळे नवे रुग्ण आढळण्याचा वेग ५.६ टक्क्यांनी घटला आहे. लॉकडाउनची कडक अंमलबजावणी होत असूनही मृतांची संख्या कमी करण्यात इटलीला अद्याप यश आलेले नाही. त्यामुळेच आर्थिक नुकसान सोसूनही लॉकडाउनची मर्यादा वाढविण्याचा सरकार विचार करत आहे. 

कठीण काळ आणखी सहा महिने
लंडन -
 पुढील सहा महिने जनजीवन सुरळीत होणार नाही, असा इशारा ब्रिटनचे  उप मुख्य वैद्यकीय अधिकारी जेनी हॅरीस यांनी सांगितले. सध्या देशात लॉकडाउन असून दर तीन आठवड्यांनी याबाबत आढावा घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. लॉकडाउन उठवून व्यवहार लवकर सुरु केल्यास विषाणूचा संसर्ग पुन्हा वाढू शकतो, असेही त्यांनी सांगितले. ब्रिटनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दोन लाखांवर पोहोचली आहे.

आखातांमधील स्थलांतरीतही अडचणीत
संसर्ग पसरण्याच्या भीतीने जगातील बहुतेक देशांनी आपापल्या सीमा बाहेरून येणाऱ्यांसाठी बंद केल्याने आखाती देशांमध्ये काम करणारे लाखो स्थलांतरित कामगार येथे अडकून पडले आहेत. लॉकडाउनमुळे आखाती देशांमधील अनेक उद्योग बंद आहेत. या उद्योगांनी कामगारांचे पगार रोखून धरले आहेत, तर काहींनी कर्मचारी कपात केली आहे. त्यामुळे लाखो कामगार अडचणीत सापडले आहेत. लॉकडाउनची कडक अंमलबजावणी सुरु असल्याने कामगारांना घराबाहेर पडता येत नाही. या सर्वांना किराणा सामानाची कमतरता जाणवत आहे. सरकारकडून या सामानाचा पुरवठा अत्यंत कमी प्रमाणात होत आहे. अनेक कामगार कतारची राजधानी दोहा येथील औद्योगिक वसाहतीत विलगीकरण कक्षात आहेत. त्यांना स्वच्छतेच्या योग्य सुविधाही मिळत नसल्याची तक्रार आहे. यावरून मानवाधिकार संघटनांनीही टीका केली आहे. वेतन मिळत नसल्याने किंवा कामावरून काढून टाकल्याने पैशांची कमतरता लवकरच निर्माण होऊन त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे.

न्यूयॉर्कमध्ये मृतांची संख्या हजारांवर
न्यूयॉर्क -
 अमेरिकेत कोरोनाच्या बळींची संख्या तीन हजाराकडे सरकत असताना एकट्या न्यूयॉर्क प्रांतातील मृतांची संख्या एक हजारांच्यावर गेली आहे. यातील अनेक जणांचा मृत्यू गेल्या काही दिवसांतील आहे. न्यूयॉर्कमध्ये एक मार्चला एक रुग्ण आढळला, दोन दिवसांनी दुसरा रुग्ण आढळला. यानंतर रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ झाली.

राजपुत्र हॅरीच्या सुरक्षेचा खर्च अमेरिका करणार नाही
लंडन -
 अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिटनचे राजपुत्र हॅरी आणि त्यांची पत्नी मेघन मर्केल यांच्या सुरक्षेचा खर्च उचलण्यास नकार दिला आहे. यापुढे त्यांनी स्वतः खर्च करावा, असे ट्विट ट्रम्प यांनी केले. हॅरी व मेघन यांनी कॅनडामधून अमेरिकेत स्थलांतरीत होण्याचा निर्णय घेतला. हे दोघे माझे चांगले मित्र आहेत. आता त्यांनी अमेरिकेसाठी कॅनडा सोडले आहे. मात्र सुरक्षेचा खर्च त्यांनी स्वतः करावा, असे ट्रम्प म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com