esakal | कोरोनाचा कहर ! भारतातून येणाऱ्या विमानांना हाँगकाँगमध्ये बंदी
sakal

बोलून बातमी शोधा

हाँगकाँगने भारतातून येणाऱ्या विमानांना मंगळवारपासून 3 मेपर्यंत स्थगिती दिली आहे.

कोरोनाचा कहर ! भारतातून येणाऱ्या विमानांना हाँगकाँगमध्ये बंदी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली- भारतात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे. कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही मोठे आहे. अनेक राज्यांनी लॉकडाऊनसारख्या पर्यायांचा अवलंब केला आहे. याचदरम्यान इतर देशांनीही भारतातून येणाऱ्या प्रवासी आणि विमानांवर तात्पुरती बंदी घातली आहे. हाँगकाँगने भारतातून येणाऱ्या विमानांना मंगळवारपासून (दि.20) 3 मेपर्यंत स्थगिती दिली आहे. या काळात भारतातील एकाही विमानाला हाँगकाँगमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. भारतातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर हाँगकाँग सरकारने हे पाऊल उचलले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हाँगकाँग सरकारने पाकिस्तान आणि फिलीपाइन्स येथून येणाऱ्या विमानांनाही याच काळात स्थगिती दिली आहे. या महिन्यात विस्तारा एअरलाइन्सच्या दोन विमानातून आलेले 50 प्रवासी कोरोना बाधित आढळून आल्यानंतर हाँगकाँग सरकारने हा निर्णय घेतला आहे.

हाँगकाँगच्या नियमानुसार तिथे जाण्यापूर्वी कमाल 72 तास आधी सर्व प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी करणे आवश्यक आहे. यात रिपोर्ट निगेटिव्ह असणे गरजेचे आहे. यापूर्वी रविवारी हाँगकाँग सरकारने मुंबईहून येणाऱ्या विस्तारा एअरलाइन्सचे सर्व उड्डाणे 2 मे पर्यंत स्थगित करण्याची घोषणा केली होती. या एअरलाइन्सने मुंबईहून आलेले तीन प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला होता.

दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी रविवारी कोरोना प्रतिबंधक लसीचे उत्पादन सप्टेंबरपर्यंत 10 पट वाढवले जाणार असल्याचे सांगितले. तर रेमडेसिविर इंजेक्शनचे उत्पादन मेपर्यंत दुप्पट म्हणजे दरमहा 74.1 लाख होईल. त्यांनी एकापाठोपाठ एक असे सलग टि्वट करत याची माहिती दिली. कोरोनाशी निपटण्यासाठी आणि ऑक्सिजनची पूर्तता करण्यासाठी राज्यांना मदत केली जात असल्याचे सांगितले. रेमिडिसिविरच्या निर्यातीला बंदी घालण्यात आली आहे.

हेही वाचा: 'मोदी पंतप्रधान नव्हे पक्षपाती प्रचारक'

हर्षवर्धन म्हणाले की, केंद्राने महाराष्ट्राला 1121, उत्तर प्रदेशला 1700, झारखंडला 1500, गुजरातला 1600, मध्य प्रदेशला 152 आणि छत्तीसगडला 230 व्हेंटिलेटर उपलब्ध करुन दिले आहेत. सप्टेंबर 2021 पर्यंत कोव्हॅक्सिनचे उत्पादन 10 पट वाढवले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा: कोरोनाच्या संकटात रतन टाटांचा पुन्हा मदतीचा हात; ऑक्सिजनचा करणार पुरवठा