धक्कादायक! कोरोनाचे अर्ध्याहून जास्त डोस श्रीमंत देशांनी केलेत बुक

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 September 2020

व्हॅक्सिनचं बुकिंग करणाऱ्या देशांमधील लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येपैकी केवळ 13 टक्के इतकी आहे. 

वॉशिंग्टन - कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या या संकटात आता व्हॅक्सिनबाबत एक धक्कादायक रिसर्च समोर आला आहे. यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की काही निवडक श्रीमंत देश कोरोना व्हायरसच्या संभाव्य व्हॅक्सिनचं अर्ध्याहून जास्त बुकिंग केलं आहे. ब्रिटनच्या ऑक्सफॅनच्या रिपोर्टनुसार कोरोना व्हॅक्सिन तयार करण्यामध्ये आघाडीवर असलेल्या पाच कंपन्या जवळपास 5.9 अब्ज डोस तयार करतील. 

कोरोनाच्या लशींचे उत्पादन जर 6 अब्ज डोस इतकं झालं तर ते 3 अब्ज लोकांना दिलं जाऊ शकतं. एका व्यक्तीला दोन डोस दिले जातील. आता जे काही 5.9 अब्ज डोस तयार केले जात आहेत त्यापैकी अमेरिका, ब्रिटन, युरोपीय संघ, ऑस्ट्रेलिया, हाँगकाँग, मकाऊ, जपान, स्वित्झर्लंड आणि इस्राईल या देशांनी आधीच अर्ध्याहून जास्त डोस खरेदी केले आहेत.

व्हॅक्सिनचं बुकिंग करणाऱ्या देशांमधील लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येपैकी केवळ 13 टक्के इतकी आहे. तर उर्वरीत 2.6 अब्ज व्हॅक्सिन भारत , बांगलादेश आणि चीन या देशांनी बुक केली आहेत. दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी म्हटलं की, पुढच्या महिन्यात अमेरिका कोरोना व्हॅक्सिन रोल आऊट करण्यास सुरू करेल. मात्र ट्रम्प यांच्याच एका अधिकाऱ्याने  2021 पर्यंत व्हॅक्सिन येणं शक्य नाही असं सांगितलं आहे. 

एकीकडे अध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे ट्रम्प प्रशासनाने सर्व नागरिकांसाठी कोरोनाची लस मोफतपणे देण्याची योजना आखली आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार असून ही योजना अमेरिकी नागरिकांना दिलासादायक ठरणार आहे.

ट्रम्प प्रशासनाच्या योजनेनुसार, अमेरिकेत कोरोना लसीकरण मोहिम जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू होऊ शकते. अमेरिकेच्या आरोग्य आणि मानवी सेवा विभाग तसेच संरक्षण विभागाने संयुक्तपणे काल या योजनेसंदर्भातील निवेदन जारी केले. त्यात ट्रम्प प्रशासनाच्या मोफतपणे लस वितरण करण्याच्या मुद्द्याला अधोरेखित केले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid 19 pandemic 51 percent vaccine pre booking by rich country