esakal | जगातील पहिल्या कोरोना लसीची 12 ऑगस्ट रोजी नोंदणी!
sakal

बोलून बातमी शोधा

Covid_Vaccine1.jpg

रशियामधून कोरोना विषाणूसंबंधी एक मोठी बातमी आली आहे. रशियात कोरोना लसीच्या सर्व चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत. त्यामुळे ऑक्टोंबरपासून देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम चालवली जाणार आहे

जगातील पहिल्या कोरोना लसीची 12 ऑगस्ट रोजी नोंदणी!

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मॉस्को- रशियामधून कोरोना विषाणूसंबंधी एक मोठी बातमी आली आहे. रशियात कोरोना लसीच्या सर्व चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत. त्यामुळे ऑक्टोंबरपासून देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम चालवली जाणार आहे, अशी माहिती रशियाचे आरोग्य मंत्री मिखाईल मुराश्को यांनी दिली आहे. लसीकरणासाठी येणारा सर्व खर्च सरकार उचलणार असून 12 ऑगस्ट रोजी जगातील पहिली कोरोना लसीची नोंदणी केली जाणार असल्याचं रशियाचे उपआरोग्यमंत्री ओलेग ग्रिदनेव यांनी सांगितलं आहे.

कोरोनामुक्त झालेल्या 90 टक्के रुग्णांमध्ये फुफ्फुसाचा आजार

आम्ही कोरोना चाचणीच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. हा टप्पा खूप महत्वपूर्ण आहे. आतापर्यंच या लसीपासून सुरक्षित परिणाम दिसून आले आहेत. वैद्यकीय कर्मचारी आणि वरिष्ठ नागरिकांना सर्वात आधी लस देण्यात येणार आहे. देशातील मोठ्या संख्येला लस दिल्यानंतर लोकांमध्ये रोग प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचे दिसून येईल, असं ग्रिदनेव म्हणाले आहेत.

रशियाने कोरोनावरील लस सर्व चाचण्यांमध्ये 100 टक्के यशस्वी ठरल्याचा दावा केला आहे. या लसीला रशिया संरक्षण मंत्रालय आणि गमलेया नॅशनल सेंटर ऑफ रिसर्च यांनी तयार केलं आहे. ज्या लोकांना  कोरोना लस देण्यात आली, त्या सर्व लोकांमध्ये SARS-CoV-2 विरोधात रोग प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचं रशियाकडून सांगण्यात आलं आहे. 42 दिवसांपूर्वी या लसीवरील प्रयोग सुरु करण्यात आला होता. त्यावेळी काही स्वयंसेवकांना लस टोचण्यात आली होती. सोमवारी या स्वयंसेवकांची पुन्हा तपासणी करण्यात आली. सर्व लोकांमध्ये कोरोना विरोधात प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे या लसीला मान्यता देण्यात येणार आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. 

21 दिवसांत देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 10 लाखांहून 20 लाखांच्या घरात

ऑक्टोंबर महिन्यापासून देशभर लसीकरण सुरु

परिक्षणानंतरच्या परिणामावरुन हे स्पष्ट होत आहे की लस लोकांमध्ये रोग प्रतिकारशक्ती विकसीत करत आहे. शिवाय कोणत्याही स्वयंसेवकामध्ये दुष्परिणाम दिसून आलेले नाहीत. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात या लसीच्या वापरासाठी मान्यता घेतली जाणार आहे, असं संरक्षण मंत्रालयाने सांगितलं आहे. रशियाने दावा केला आहे की, कोविड-19 लस विकसीत करण्यामध्ये रशिया सर्व देशांच्या पुढे आहे. शिवाय रशियाने सर्व नागरिकांना लस देण्यासाठी तयारी चालवली आहे. ऑक्टोंबरमध्ये लसीकरण मोहिम हाती घेण्यात येणार आहे. 

दरम्यान, जगभरातील वैद्यानिक कोरोनावरील लस निर्माण करण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करत आहे. सध्या 140 पेक्षा अधिक उमेदवार कोरोनावरील प्रभावी लस तयार करण्यासाठी स्पर्धेत आहेत. यातील 17 उमेदवार मानवी चाचणीच्या पहिल्या टप्प्यात आहेत, तर 13 उमेदवार दुसऱ्या टप्प्यात गेले आहेत. 5 उमेदवारांनी तिसऱ्या टप्प्यांपर्यंत मजल मारली आहे. रशियाचा दावा खरा ठरला तर कोरोनावरील पहिली लस ठरणार आहे.

(edited by-kartik pujari)
 

loading image