esakal | फ्रिडम डे: सर्व कोरोना निर्बंध हटवले; ब्रिटनचे धाडस कशाच्या जीवावर?
sakal

बोलून बातमी शोधा

britain

कोरोना महामारीचे थैमान असून थांबलेले नाही. तरीही ब्रिटनने नागरिकांना दिलासा दिला आहे. 19 जुलैपासून ब्रिटनमधील कोरोना निर्बंध हटवण्यात आले आहेत.

ब्रिटनने सर्व कोरोना निर्बंध हटवले; धाडस कशाच्या जीवावर?

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

लंडन- कोरोना महामारीचे थैमान असून थांबलेले नाही. तरीही ब्रिटनने नागरिकांना दिलासा दिला आहे. 19 जुलैपासून ब्रिटनमधील कोरोना निर्बंध हटवण्यात आले आहेत. तसेच दोन्ही लस घेतलेल्या लोकांना मास्क न लावण्याची सवलत देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ब्रिटनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. देशात 50 हजारांच्या आसपास कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. असे असताना पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी निर्बंध हटवत असल्याचं जाहीर केलंय. AFP च्या हवाल्याने एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

ब्रिटनमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना निर्बंध लादण्यात आले होते. तसेच लॉकडाऊनचा कालावधी अनेकदा वाढवला होता. याचे विपरीत परिणाम अर्थव्यवस्थेवर पडत होते. शिवाय लोकांमध्ये संताप दाटू लागला होता. ब्रिटनमध्ये रुग्णसंख्या वाढत असली तरी मृत्यदर कमी आहे. मोठ्या प्रमाणात लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. लोकांना आता कोरोना विषाणूसोबत जगण्यास शिकायला हवं असं बोरिस जॉन्सन म्हणाले होते. अखेर त्यांनी लोकांना दिलासा दिला आहे.

हेही वाचा: विरोधकांची मोदी सरकारला घेरण्याची तयारी, आजपासून पावसाळी अधिवेशन

एका मोठ्या लोकसंख्येला ब्रिटनमध्ये लशीचा डोस मिळाला आहे. लसीकरणामुळे मृत्यूदर कमी आहे. कोरोना साध्या सर्दी-तापासारखा असल्याची भावना रुजत आहे. त्यामुळे ब्रिटनने कोरोना निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला. देशातील नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. सर्व प्रौढांना 31 जुलैपूर्वी लस देण्याचे येथील सरकारचे उद्दीष्ट्य वेळेआधी आजच पूर्ण झाले आहे. सरकारच्या या यशाबद्दल ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी आनंद व्यक्त केला. पंतप्रधान जॉन्सन यांनी 31 जुलैपर्यंत देशातील प्रत्येक प्रौढ व्यक्तीला कोरोना प्रतिबंधक लशीचा किमान एक तरी डोस देण्याचे, तसेच 19 जुलैपर्यंत किमान दोन तृतियांश प्रौढांना दोन्ही डोस देण्याचे लक्ष्य आरोग्य यंत्रणेच्या समोर ठेवले होते. ही दोन्ही उद्दीष्ट्ये वेळेआधी साध्य झाली आहेत.

आज ब्रिटन सरकारने सर्व निर्बंध हटवले आहेत. ‘फ्रिडम डे’च्या पार्श्वभूमीवर मिळालेले हे यश महत्त्वाचे मानले जात आहे. ब्रिटनमध्ये आठ महिन्यांपूर्वी लसीकरण मोहिम सुरु झाली होती. त्यानंतर अत्यंत नियोजनपूर्वक तिची अंमलबजावणी करण्यात आली. जॉन्सन यांनी जनतेचे आभार मानताना आता उर्वरित जणांनीही तातडीने लस घ्यावी, असे आवाहन केले आहे.

हेही वाचा: काँग्रेसमध्ये संसदीय गटांची पुनर्रचना; असंतुष्ट नेत्यांना संधी

ब्रिटनमधील लसीकरण

८७.८ टक्के : पहिला डोस घेतलेले

६७.८ टक्के : दोन्ही डोस घेतलेले

लसीकरणासाठी पुढाकार घेतलेल्या आणि इतरांना मदत केलेल्या सर्वांचे आभार ! तुमच्या मदतीमुळेच आपण आता सर्व निर्बंध हटवून सर्वसामान्य जीवन जगणार आहोत, असं बोरीस जॉन्सन म्हणाले.

loading image