esakal | काँग्रेसमध्ये संसदीय गटांची पुनर्रचना; असंतुष्ट गटातील नेत्यांना संधी
sakal

बोलून बातमी शोधा

rahul soniya gandhi.jpg

संसद अधिवेशन सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला सोनिया गांधींनी दोन्ही सभागृहांमधील संसदीय गटांच्या पुनर्रचनेतून, लोकसभेच्या गट नेतेपदी अधीररंजन चौधरी हेच राहणार असल्याचे स्पष्ट केले.

काँग्रेसमध्ये संसदीय गटांची पुनर्रचना; असंतुष्ट नेत्यांना संधी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली- काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीररंजन चौधरी यांना बदलणार असल्याच्या अटकळबाजीला पक्षाध्यक्षा सोनिया गांधींनी पूर्णविराम दिलाय. संसद अधिवेशन सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला सोनिया गांधींनी दोन्ही सभागृहांमधील संसदीय गटांच्या पुनर्रचनेतून, लोकसभेच्या गट नेतेपदी अधीररंजन चौधरी हेच राहणार असल्याचे स्पष्ट केले. (Reorganization of parliamentary groups by Sonia gandhi Opportunity for dissident group leaders)

संसदेच्या पावसाळी अधिवेशनास आजपासून (ता. १९) सुरवात होणार असून दोन्ही सभागृहांमध्ये काँग्रेसच्या प्रभावी कामगिरीसाठी, काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या या नात्याने सोनिया गांधी यांनी संसदीय गटांची पुनर्रचना केली आहे. यासंदर्भात सोनियांनी सर्व पक्ष खासदारांना पत्र लिहून माहिती दिली. यानुसार लोकसभेतील संसदीय गटामध्ये मनीष तिवारी आणि शशी थरूर यांचा नव्याने समावेश झाला आहे. या गटामध्ये लोकसभेतील गटनेते अधीररंजन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली गौरव गोगोई, मनीष तिवारी, मणिकम टागोर आणि रवनीतसिंग बिट्टू हे आहेत. त्यांच्यासोबत तिवारी आणि थरूर यांनाही संसदीय गटात सहभागी करण्यात आले आहे.

हेही वाचा: नवज्योतसिंग सिद्धू यांची पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती

त्याचप्रमाणे राज्यसभेच्या संसदीय गटामध्ये दिग्विजयसिंह, पी. चिदंबरम आणि अंबिका सोनी यांना स्थान देण्यात आले आहे. याआधीच्या गटामध्ये विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली आनंद शर्मा, जयराम रमेश आणि के. सी. वेणुगोपाल यांचा समावेश होता. अधिवेशन काळात सभागृहनिहाय काँग्रेसची रणनिती ठरविण्याची जबाबदारी या गटांकडे असेल आणि संसदीय गटातील खासदार नियमितपणे चर्चाही करतील. आवश्यकतेनुसार दोन्ही गटांची संयुक्त बैठक बोलावण्याचे अधिकार मल्लिकार्जुन खर्गे यांना देण्यात आले आहे.

हेही वाचा: कोरोनात आता नवं संकट; चीनमध्ये Monkey B विषाणूचा पहिला बळी!

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये लोकसभेतील गटनेते बदलाच्या चर्चेला उधाण आले होते. अधीररंजन चौधरी यांना या पदावरून हटवून मनीष तिवारी किंवा शशी थरूर यांना आणले जाईल, अशा बातम्या रंगल्या होत्या. काँग्रेसमधील असंतुष्ट गटाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जी-२३ गटामध्ये तिवारी आणि थरूर यांचाही समावेश होतो.

loading image