कोरोनामुळे असलेला मृत्यूचा धोका, सूर्य किरणांमुळं टळतो; संशोधकांचा दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona

सुर्यकिरणं आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूबाबत नवीन माहिती समोर आली आहे.

कोरोनामुळे असलेला मृत्यूचा धोका, सूर्य किरणांमुळं टळतो; संशोधकांचा दावा

लंडन - जगात अनेक देशांमध्ये कोरोनाचा पुन्हा हाहाकार सुरु आहे. जगभरात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली असूनही अद्याप कोरोना आटोक्यात आलेला नाही. कोरोना व्हायरसचा संसर्ग सुरु झाल्यापासून यावर मोठ्या प्रमाणात संशोधन झाले आहेत. आताही एक संशोधन समोर आलं असून त्यामध्ये सुर्यकिरणं आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूबाबत नवीन माहिती समोर आली आहे. एका  संशोधनात असं सांगण्यात आलं आहे की, जास्त वेळ सुर्याच्या प्रकाशात राहिल्यानं अतिनिल किरणांच्या संपर्कात येण्याचं कनेक्शन कोरोनामुळे कमी मृत्यू होण्याशी आहे. ब्रिटनच्या एडिनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी असा दावा केला आहे. जर संशोधनात कमी मृत्यूदर आणि सूर्य किरणं यांचा संबंध दिसून आला तर लोकांचे आरोग्य सुरक्षित राखण्यासाठी याची मोठी मदत होणार आहे. 

ब्रिटिश जर्नल ऑफ डर्माटोलॉजीमध्ये अभ्यास संशोधन प्रसिद्ध झालं आहे. यामध्ये अमेरिकेत जानेवारी ते एप्रिल 2020 या काळात झालेले मृत्यू आणि त्या काळात 2474 काऊंटीमध्ये अतिनिल किरणांच्या तीव्रतेची तुलना करण्यात आली. यामध्ये संशोधकांना असं आढळून आलं की, अतिनिल किरणांची तीव्रता अधिक असलेल्या भागात कोरोनामुळे कमी लोकांचा मृत्यू झाला. 

हे वाचा - Fact Check : १५ एप्रिलपर्यंत होणार ५० हजार जणांचा मृत्यू?

संशोधकांनी इंग्लंड आणि इटलीतही अशा प्रकारचा अभ्यास केला आहे. यामध्ये वय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती, लोकसंख्येची घनता, वायू प्रदुषण, तापमान आणि स्थानिक भागातील संसर्गाचं प्रमाण इत्यादी बाबींची माहिती घेतल्यानंतर कोरोनाची लागण आणि मृत्यूचा धोका याचे विश्लेषण करण्यात आले. सूर्याच्या प्रकाशात जास्त काळ राहिल्यानं त्वचेतून नायट्रिक अॅसिड बाहेर निघतं. यामुळे विषाणूचा ससंर्ग होण्याचं प्रमाण कमी होतं अशी माहिती संशोधकांनी दिली आहे. 

कोरोनामुळे होणारे मृत्यू आणि त्याचा धोका कमी आहे हे व्हिटॅमिन डीची पातळी जास्त आहे यावरून सांगता येणार नाही असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. व्हिटॅमिन डी तयार होण्यासाठी पुरेशी अतिनिल किरणं पोहोचतं नसलेल्या भागाचा या संशोधनामध्ये समावेश होता. अभ्यासातून अशी माहिती समोर आली की, जिथं 95 टक्क्याहून अधिक अतिनिल किरणं पोहोचतात तिथं कोरोनामुळे मृत्यूचा धोका कमी आहे. याउलट अतिनिल किरणांची तीव्रता कमी असलेल्या भागात  मात्र कोरोनामुळे मृत्यूचं प्रमाण जास्त असल्याचं आढळलं आहे. 

हे वाचा - एस्ट्राझेनेकाचा दुष्परिणाम; फ्रान्समध्ये दुसरा डोस वेगळ्या लसीचा

संशोधकांनी कोरोनामुळे मृत्यूचा धोका कोणाला आहे याची यादी तयार केली. यामध्ये वय, आर्थिक परिस्थिती, लोकसंख्या, हवा प्रदुषण, तापमान आणि संसर्गाचे स्थानिक परिसरात असलेलं प्रमाण यांचा समावेश होता. 

याआधीही सूर्य प्रकाशाबाबत संशोधन झालं आहे. त्यामध्ये अशी माहिती समोर आली होती की, सूर्य प्रकाशात जास्त काळ राहिल्यानं कमी रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि हृदय, रक्तवाहिन्या त्यांचं काम योग्य पद्धतीनं करतात. निरीक्षणाच्या पद्धतीने संशोधन केलं असल्यानं यातून थेट कारण आणि परिणाम शोधणं शक्य नाही. मात्र उपचारासाठी याची मदत होऊ शकेल. 
 

Web Title: Covid19 Deaths Sunlight Causes Reduction Mortality Rates Research

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top