कोरोनापेक्षा धोकादायक विषाणू आढळला; दहा पटीने अधिक हानीकारक

वृत्तसंस्था
Tuesday, 18 August 2020

मलेशियातील संशोधकांना कोरोनाव्हायरसचा नवा अन दहा पटीने जास्त धोकादायक प्रकार आढळला आहे. याला ‘डी६१४जी’ असे नाव असलेला हा विषाणू ‘सार्स- सीओव्ही-२’या विषाणूचे हे बदलले रूप आहे. 

क्लाललांपूर -  कोरोनाव्हायरसचा फैलाव सर्व जगात असून तो रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असतानाच मलेशियातील संशोधकांना कोरोनाव्हायरसचा नवा अन दहा पटीने जास्त धोकादायक प्रकार आढळला आहे. याला ‘डी६१४जी’ असे नाव असलेला हा विषाणू ‘सार्स- सीओव्ही-२’ या विषाणूचे हे बदलले रूप आहे. 

भारतीय नागरिकामुळे संक्रमण 
‘डी६१४जी’चे संक्रमण कोरोनापेक्षा वेगाने होऊ शकते आणि त्याचे परिणामही दीर्घकाळ असू शकतात. कोरोनाची जागतिक साथ कधी जाणार याबद्दल अनिश्‍चितता असून आता या नव्या शक्तीशाली विषाणूचा धोका निर्माण झाला आहे. हा विषाणू प्रथम जुलैमध्ये आढळला. कोरोनाचे हे नवे रूप ४५ कोरोनारुग्णांपैकी तीन जणांमध्ये दिसले. याआधी भारतातून मलेशियात परतलेल्या एका रेस्टॉरंटच्या मालकाच्या माध्यमातून ‘डी६१४जी’चा संसर्ग पसरला. या भारतीयाने मलेशियात पोचल्यावर १४ दिवस गृहविलगीकरणाचा नियम पाळला नाही. त्याच्यामुळे ४५ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील तीन रुग्णांच्या चाचणीत कोरोनापेक्षा घातक ‘डी६१४जी’ विषाणूचा संसर्ग आढळला. या रेस्टॉरंट मालकाला पाच महिन्यांचा तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा मलेशिया सरकारने सुनावली आहे. 

लसीवर परिणाम 
मलेशियाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक नूर हिशाम अब्दुल्ला म्हणाले की, कोरोनाची जी रूपे समोर येतात त्यांचे परिणाम वेगवेगळे असतात. लशींच्या क्षमतेवरही याचा परिणाम काही प्रमाणात दिसून येतो. कोरोनाचे हा नवा प्रकार आढळला ही बाब चिंताजनक असून मलेशियातील नागरिकांनी सावधगिरी बाळगणे आवश्‍यक आहे. याची साखळी तोडण्यासाठी लोकांना मदत करायला हवी, असे ते म्हणाले. 

अमेरिकेत दिसले कोरोनातील बदल 
कोरोनाव्हायरसचे वेगवेगळे प्रकार अमेरिका व युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात दिसले, मात्र ते फारसे धोकादायक नाहीत. ‘सेल प्रेस’ नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधातील माहितीनुसार कोरोनाच्या अशा बदलत्या रूपांमुळे लशींच्या क्षमतेवर याचा फारसा परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. 

कोरोनाचा प्रसार रोखण्यात यश 
दरम्‍यान, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मलेशियाने केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे तेथे २८ जुलैपासून आतापर्यंत (१६ ऑगस्ट) येथे केवळ २६ नवे रुग्ण आढळले आहेत. मात्र कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याने नागरिकांना दक्षतेचा  इशारा दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dangerous virus was found than corona