esakal | मुंबईतील वाहतूक एकाच तिकिटावर: देवेंद्र फडणवीस
sakal

बोलून बातमी शोधा

न्यूयॉर्क (अमेरिका) : भारतीय कॉन्सूलेट जनरल आणि फ्रेंड्‌स ऑफ महाराष्ट्र आयोजित ‘मुंबई मिट्‌स मॅनहॅटन’ या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेताना ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार.

दुष्काळमुक्त महाराष्ट्रसाठी जलयुक्त शिवारसारख्या योजनांचे परिणाम दिसून येत आहेत. सद्यस्थितीत ११ हजारपेक्षा अधिक गावांना पाणी मिळत असल्यामुळे तिथे टॅंकरची आवश्‍यकता भासत नाही.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

मुंबईतील वाहतूक एकाच तिकिटावर: देवेंद्र फडणवीस

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

शाश्‍वत शेतीसाठी जलसंधारण महत्त्वाचे

न्यूयॉर्क : मुंबईत वाहतुकीच्या विविध साधनांचे एक प्रचंड जाळे निर्माण होत असून, ही संपूर्ण प्रणाली एकाच तिकिटावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. भारताचा न्यूयॉर्कमधील वाणिज्य दूतावास आणि फ्रेंड्‌स ऑफ महाराष्ट्राच्यावतीने आयोजित एका समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. ‘मुंबई मिट्‌स मॅनहॅटन’ या कार्यक्रमात ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष आणि ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली.


न्यूयॉर्कमध्ये झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या प्रगतीविषयीच्या प्रश्नांना दिलेल्या मनमोकळ्या उत्तरांनी उपस्थितांना भुरळ घातली. कार्यक्रमात मराठीतून संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘न्यूयॉर्कमध्ये महाराष्ट्रीयांनी, मराठी माणसांनी घेतलेली भरारी पाहूनसुद्धा अतिशय आनंद होतो आहे.’’

मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून पनवेलपर्यंत आणि चर्चगेटपासून विरारपर्यंतच्या दोन्ही मार्गांवर तयार होणाऱ्या मार्गांची वाहतूक क्षमता दुप्पट असणार आहे. पावसाळ्यानंतर रोरो सर्व्हिस सुरू करत आहोत. जलवाहतुकीच्या माध्यमातून मोठ्या वाहनांसाठी रोरो सर्व्हिस वापरता येईल. यातून नवी मुंबई, कोकणाकडे जाणे सोपे होणार असून, १२० किलोमीटरचे अंतर केवळ अर्ध्या तासात पूर्ण करता येऊ शकेल. यासाठी अमेरिकेतील न्यूयॉर्कसारख्या काही शहरांप्रमाणे सिंगल तिकीट प्रणाली निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणजे एकाच तिकिटावर मेट्रो, मोनो, बस, वॉटर ट्रान्सपोर्टद्वारे प्रवास करता येणार आहे.’’

राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्य सरकार करीत असलेल्या प्रयत्नांबद्दलही मुख्यमंत्री बोलले. राज्यातल्या ११ हजार खेड्यांना आता टॅंकरची आवश्‍यकता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शाश्वत शेतीसाठी जलसंधारण सर्वाधिक महत्त्वाचे आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

‘मोदींमुळे बँक खाते समजले’
मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचीही प्रशंसा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतात मूलभूत परिवर्तन होत आहे. पायाभूत सुविधांचा विकास करणे मला महत्त्वाचे वाटते. या मूलभूत सुविधांमुळेच देशातील ३० कोटी लोकांना बॅंक व बॅंक खाते काय असते हे समजले. ही भारतातीलच नव्हे तर जगातील मोठी क्रांती आहे. आज देशातील सात कोटी कुटुंबांना शौचालये, एक कोटी कुटुंबांना घरे, पाच कोटी कुटुंबांना गॅस कनेक्‍शन, कोट्यवधी लोकांच्या गावांत वीज पोचली आहे आणि पुढील वर्षापर्यंत एकही घर वीज न पोचल्याचे राहणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

loading image
go to top