घाईघाईत खाल्ल्याने ओढवला मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

कॅलिफोर्नियाच्या फ्रेन्सो येथे मंगळवारी "वर्ल्ड टॅको इटिंग चॅम्पियनशिप' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

कॅलिफोर्निया : टॅकोस खाण्याची स्पर्धा एका व्यक्तीला महाग पडली असून स्पर्धा जिंकण्यासाठी घाईघाईत खाल्ल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना कॅलिफोर्निया येथे घडली आहे. डॅना हचिंग्स (41) असे मृत व्यक्तीचे नाव असून मंगळवारी रात्री रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.

कॅलिफोर्नियाच्या फ्रेन्सो येथे मंगळवारी "वर्ल्ड टॅको इटिंग चॅम्पियनशिप' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी या स्पर्धेत डॅना हचिंग्स यांनीदेखील सहभाग घेतला होता. या वेळी तेथील उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार हचिंग्स यांच्याकडे सर्वांचे लगेचच लक्ष गेले; कारण ते इतरांपेक्षा अतिशय वेगात खात होते. अगदी न चावता थेट गिळत होते. 

त्यानंतर 7 मिनिटांतच हचिंग्स हे अचानक जमिनीवर पडले, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यालादेखील मार लागला. त्यानंतर लगेचच स्पर्धा बंद करण्यात आली व हचिंग्स यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र त्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे अद्याप कारण अजून समोर आलेले नाही. तसेच त्यांनी नक्की किती टॅकोस खाल्ले हेदेखील स्पष्ट झालेले नाही. याआधी 2018 मध्ये याच स्पर्धेत एका व्यक्तीने 8 मिनिटांत 73 टॅकोस खात ही स्पर्धा जिंकली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: death due to rush hour eating