esakal | दुबईत सर्वांत खोल जलतरण तलाव
sakal

बोलून बातमी शोधा

Swimming Pool

दुबईत सर्वांत खोल जलतरण तलाव

sakal_logo
By
प्रशांत पाटील

दुबई - जगातील सर्वांत उंच इमारत, सर्वांत वेगवान रोलरकोस्टर अशी अभियांत्रिकी व स्थापत्यकलेची अनेक आश्चर्ये असणाऱ्या दुबईच्या (Dubai) शिरपेचात जगातील सर्वांत खोल जलतरण तलावाच्या (Swimming Tank) रुपाने आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ‘डीप डाईव्ह’ नावाच्या या जलतरण तलावाचे नुकतेच उद्‌घाटन झाले. हा तलाव ६० मीटर खोल आहे. इतर कोणत्याही जलतरण तलावाच्या तुलनेत या तलावात अधिक खोल जाता येते. (Deepest Swimming Pool in Dubai)

‘डीप डाईव्ह’चे संचालक जारोद जाबलोन्स्की यांनी या वैशिष्ट्यपूर्ण तलावाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, की समुद्रकिनारी आढळणाऱ्या शिंपल्याप्रमाणे या जलतरण तलावाची रचना आहे. पाण्यात खोलवर जाऊन मोती काढण्याच्या परंपरेला शिंपल्याच्या रचनेतून संयुक्त अरब अमिरातीने गौरविले आहे. सर्वाधिक खोल तलाव म्हणून या तलावाची गिनेस बुकमध्येही नोंद झाली आहे. या तलावात एक कोटी ४० लाख लिटर ताजे पाणी सामावू शकते. ते सहा ऑलिंपिक जलतरण तलावाइतके आहे. जागतिक पर्यटनाच्या नकाशावर महत्त्वाचे केंद्र असलेले दुबई कोरोनाविरुद्धच्या लढ्यातही आघाडीवर आहे. दुबईने जगातील सर्वाधिक वेगवान लसीकरण मोहिमेचाही मान पटकाविला. कोरोनामुळे प्रलंबित राहिलेल्या ‘एक्स्पो २०२०’ चे आयोजनही दुबईत येत्या ऑक्टोबरपासून होत आहे.

हेही वाचा: पाक लष्कराच्या तुकडीवर दहशतवादी हल्ला; अधिकाऱ्यासह ११ सैनिक ठार

तलावाची वैशिष्ट्ये

खोली (मीटर) - ६०

पाणी (लिटर) - एक कोटी ४० लाख

तिकीट (डॉलर, प्रतितास) - १३५ आणि ४१०

‘डीप डाईव्ह’ या जलतरण तलावात प्रकाश व संगीताच्या मदतीने या तलावात पाण्याखालील खेळही खेळता येतात. मनोरंजन व सुरक्षिततेसाठी तलावात ५० कॅमेरेही बसविले आहेत. सर्वसामान्यांसाठी हा तलाव लवकरच खुला होईल.

- जारोद जाबलोन्स्की, संचालक, ‘डीप डाईव्ह’ जलतरण तलाव, दुबई

loading image