esakal | न्यायाच्या दिशेने पाऊल!

बोलून बातमी शोधा

न्यायाच्या दिशेने पाऊल!

जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीयाच्या निर्घृण हत्येला जबाबदार असलेला पोलिस अधिकारी डेरीक शॉविन या दोषी ठरविण्यात आले आहे. त्याला आता ४० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकतो. या खटल्याच्या निमित्ताने ....

न्यायाच्या दिशेने पाऊल!
sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

गेलं संपूर्ण वर्ष ज्या घटनेमुळे अमेरिका ढवळून निघाली, ती ‘ब्लॅक लाइव्ज मॅटर’ चळवळ सुरू होऊन गावागावात पोहोचली, त्या खटल्याच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. मनात धाकधूक होती. व्यवस्थेवरचा उडालेला विश्वास, कायद्याच्या संरक्षकांनीच केलेली नियमांची पायमल्ली, वर्णद्वेष, वंशाचा प्रभाव या सगळ्यांचा परिणाम निकालावर झाला तर? या नुसत्या शंकेनेही जनमानसात उसळणारा प्रक्षोभ मनावर दडपण आणणारा होता. नेमक्या याच शंकेने जिथे हा खटला चालू होता, त्या मिनिओपोलिसमध्यल्या न्यायालयासमोर प्रचंड जनसमुदाय होता. त्यात सगळ्या वंशाचे, वर्णाचे लोक होते. जमावाला काबूत ठेवण्यासाठी तीन हजारांहून अधिक सुरक्षारक्षक होते. आजूबाजूच्या परिसरातील दुकानदारांनी दंगल, तोडफोड झाली तर नुकसान न होण्यासाठी दुकानांच्या खिडक्या, दारांना लाकडी फळ्या लावल्या, इतकं वातावरण तणावपूर्ण होतं.

वर्षापूर्वी २५ मे रोजी जॉर्ज फ्लॉईडच्या मानेवर जवळजवळ ९ मिनिटे पोलिस अधिकारी डेरिकने दाब दिल्याने तो मरण पावला. वीस डॉलरची खोटी नोट दुकानात जॉर्जने दिल्यावर दुकानातल्या कुणीतरी पोलिसांना फोन केला आणि त्यानंतर हे रामायण घडलं. जॉर्जच्या मानेवर गुडघ्याचा दाब देऊन पोलिस अधिकारी डेरिक बसलेला असताना तिथे असलेली माणसं जॉर्जला सोडून द्यावं, अशी विनंती करत होता, त्याला श्वास घेणं कठीण झालं आहे, त्याचा जीव जाईल असं जिवाच्या आकांताने ओरडून सांगत होता. ‘मला श्वास घेता येत नाहीये, मला मारू नका,’ हेच जॉर्जचे अखेरचे शब्द होते. ४६ वर्षांचा फ्लॉईड लहान मुलासारखा आईला आर्त स्वरात हाका मारत होता, पोलिस आता जीव घेणार हे कळल्यासारखं; मी वाईट माणूस नाही, मला मारू नका, माझं प्रेम आहे असं माझ्या मुलांना सांगा, हेच तो पुन्हा पुन्हा काकुळतीने पोलिसांना सांगत होता. पोलिसांच्या हातून कृष्णवर्णीय व्यक्ती मारली जाणं हे अमेरिकेतल्या जनतेला सवयीचं आहे. जॉर्ज फ्लॉईडचा खटला चालू असतानाच डांन्टे राईट हा २० वर्षीय कृष्णवंशीय तरुण; स्त्री पोलिसाच्या हातून मारला गेला. टेझरऐवजी चुकून पिस्तूल वापरलं असं बचावात तिने सांगितलं आणि पुन्हा प्रक्षोभ उसळला. ‘टिक टॉक’वर या स्त्री पोलिस अधिकाऱ्याच्या विधानाची खिल्ली उडवणारे व्हिडिओ धडाधड यायला लागले. याच दरम्यान १३ वर्षांच्या ॲडमला शिकागोमध्ये पोलिसांनी मारलं, ते त्याच्या हातात पिस्तूल असल्याचा संशय आल्यावरून; स्वतःचा जीवाला धोका आहे असं वाटल्यामुळे.

तरुण मनांचे बंड

गेल्या वर्षभरात पोलिसांच्या हातून मारले गेल्याचा आकडा आहे ७६५. त्यातील २८ टक्के कृष्णवर्णीय आहेत आणि अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येत फक्त १३ टक्के कृष्णवर्णीयांची संख्या आहे. असं असताना, लोकांना हे सवयीचं झालेलं असताना फ्लॉईडच्या हत्येनेच देश पेटून का उठला? विशेषतः तरुण मुलं रस्त्यावर का आली? हे झालं ते कोविडमुळे जग थांबलं त्यामुळे. लोक घराबाहेर पडत नव्हते, मुलं घरात अडकल्यासारखी झाली होती नेमकं त्याचवेळेस म्हणजे २५ मे २०२० ला ही घटना घडली आणि वर्णभेदाविरुद्ध तरुण मनांनी बंड पुकारलं. स्थलांतरित पालकांच्या मुलांनी आपणही या देशाचे नागरिक आहोत आणि आपल्या हक्कांची पायमल्ली होता कामा नये याची जाणीव करून देत पालकांच्या तटस्थपणाला आव्हान दिलं. मुलं स्वतः आंदोलनात उतरलीच पण, पालकांनाही त्यांनी वेगवेगळ्या तऱ्हेने विचार करायला, भूमिका बदलायला भाग पाडलं. या साऱ्याचा परिपाक म्हणजे मनाला दिलासा देणारा, डेरिक शॉविन या पोलिस अधिकाऱ्याला त्याच्या कृत्यासाठी जबाबदार ठरविणारा हा निकाल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

पण खरा न्यात मिळाला?

अमेरिकन न्यायपद्धतीमध्ये ज्यूरी महत्त्वाचे आहेत. ज्यूरींनी खटल्याचा निकाल द्यायचा असतो. गुन्हेगार दोषी आहे किंवा नाही हे ज्यूरी ठरवतात. शिक्षा किती ते नंतर न्यायाधीशांच्या हातात असतं. या खटल्यातले ज्यूरी चार गोरे, चार कृष्णवंशीय तर दोन मिश्रवंशीय असे वेगवेगळ्या वंशांचे होते, हे देखील खटल्याचं बलस्थान होतं. या खटल्यात गुंतलेले सर्व कोविडच्या नियमांमुळे न्यायालयात उपस्थित राहू शकत नव्हते. त्यामुळे हा खटला थेट टी. व्ही. वरून प्रक्षेपित झाला. जनतेला त्यामुळे न्यायालयाचं कामकाज कसं चालतं हे पाहण्याचा आणि इतिहासात नोंदवला जाईल असा हा खटला घरून पाहता आला. तीन आठवडे चाललेल्या या खटल्यात वकील ज्यूरींना वारंवार; तुम्ही जे चित्रीकरण पाहिलंत त्यावर विश्वास ठेवा असं आर्जव करत होते. चित्रीकरण बघा, पुन्हा पुन्हा बघा. १७ वर्षांच्या ड्रॅनेला फ्रेझर या मुलीने जे घडलं ते मोबाइलवर चित्रित केलं आणि समाजमाध्यमांमुळे ते झटक्यात घराघरात पोचलं. फ्लॉईडला वाचविण्यासाठी काही करू शकलो नाही या विचाराने सैरभैर व्हायला होतं. फ्लॉईडच्या जागी केवळ कृष्णवर्णीय असल्यामुळे आमच्यापैकीही कुणीही असू शकलं असतं हा विचार अस्वस्थ करतो असं सांगत अश्रूभरल्या स्वरात तिने साक्ष दिली. तिने केलेल्या चित्रिकरणामुळेच एका पोलिस अधिकाऱ्याच्या कृत्याची शिक्षा त्याला मिळाली पण खऱ्या अर्थी न्याय मिळाला असं म्हणता येईल का हा प्रश्नच आहे.

अध्यक्ष ज्यो बायडेन आणि उपाध्यक्षा कमला हॅरीस दोघांनी पत्रकार परिषदेत; जॉर्जच्या कुटुंबियांनी त्यांचं माणूस गमावलं आहे. काही केलं तरी ही हानी भरून निघणारी नाही. पण या निर्णयामुळे न्यायाच्या बाबतीत प्रगतीच्या दिशेने आपण पाऊल टाकलं आहे असं सांगितलं. गेल्यावर्षी सत्तेत नसतानाही फ्लॉईड गेल्यावर त्याच्या कुटुंबियांना ते भेटले होते, डेरिकला शिक्षा झाल्याचा निर्णय कळल्याकळल्या ते फ्लॉईडच्या कुटुंबियांशी बोलले.

नव्या कायद्याचे सूतोवाच

‘जॉर्ज फ्लॉईड न्याय’ नावाचा कायदा आता लवकरच येण्याची शक्यता आहे. गळा आवळणं, अमली पदार्थांचा तपास घेण्यासाठी पूर्वकल्पना न देता छापे घालण्याला मनाई, तसेच पोलिस अधिकाऱ्यांवर खटला दाखल करणं सहजसाध्य असेल, अशा बाबींचा नव्या कायद्यात समावेश असेल. कितीतरी राज्यांनी पोलिसदलात सुधारणा, प्रशिक्षण देणं या गोष्टींवर भरदेण्याचं जाहीर केलं आहे.

पालकांच्या डोळ्यात अंजन

गेल्यावर्षी मे महिन्यात डेरिक शॉविन या पोलिस अधिकाऱ्याने जॉर्ज फ्लॉईडची निघॄण हत्या केली आणि वर्षाच्या आत २१ एप्रिलला तो दोषी असल्याचा निकाल लागला. या वर्षभरात नक्की काय झालं? ब्लॅक लाइव्ज मॅटर चळवळीचा उदय झाला. १८१ कृष्णवर्णीयांची पोलिसांनी निघृणपणे हत्या केली. पुन्हापुन्हा लोक पेटून उठले, मोर्चे निघाले, दंगली उसळल्या. सगळ्या वंशांची तरुण पिढी आपल्या हक्कांसाठी लढायला तयार झाली, पालकांचे डोळे उघडायचा प्रयत्न अथकपणे करत राहिली, चळवळीत भाग घेत राहिली, काहींनी राजकारणात उतरून आम्ही या देशाचे नागरिक आहोत आणि सर्वांना सारखीच वागणूक मिळणं हा आमचा हक्क आहे यासाठी कार्यशील व्हायचं ठरवलं, त्या दिशेने पावलं टाकली. आमच्यासारख्या अनेक पालकांच्या डोळ्यात मुलांनी अंजन घातलं. मोर्चा, निदर्शनं यात प्रत्यक्ष सहभाग घेतला नाही तरी, इतकी वर्ष इथे राहूनही ज्यांची मानसिकता बदलली नाही त्यांना निदान विचार करायला तरी या मुलांनी निश्चितच भाग पाडलं.

एका कृष्णवर्णीय माणसाचा जीव गेला, एका गोऱ्या पोलिस अधिकाऱ्याला त्याची हत्या करण्याच्या आरोपावरून आता शिक्षा होईल. हे झालं म्हणजे सगळं आलबेल झालं का? नक्कीच नाही. पण, कमीतकमी पोलिस अधिकाऱ्याला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळू शकते हा दिलासा अल्पसंख्याकांना मिळाला. सर्वांनाच समान वागणूक मिळाली पाहिजे, हा इशारा कायद्याशी खेळू पाहणाऱ्या यंत्रणेला मिळाला आणि न्यायाच्या दिशेने पडलेल्या या पावलाला आता बळ मिळेल ही आशा निर्माण झाली. अमेरिकेतल्या वर्णद्वेषाच्या धगधगत्या पार्श्वभूमीवर हेही नसे थोडके. यासाठीच हा निकाल ऐतिहासिक आहे!

- मोहना प्रभुदेसाई जोगळेकर,

शार्लट, नॉर्थ कॅरोलायना

mohanajoglekar@gmail.com

(लेखिका अमेरिकेत व्यवसायाने वेब प्रोग्रॅमर आहेत. ‘मेल्टिंग पॉट’ आणि ‘रिक्त’ हे त्यांचे दोन कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. अमेरिकेतील मुलांसाठी त्या साप्ताहिक मराठी शाळाही चालवितात)