दहशतवाद नष्ट केल्याचा दावा फोल 

पीटीआय
सोमवार, 16 जुलै 2018

पाकिस्तानमध्ये चार दिवसांत तीन दहशतवादी हल्ल्यांमध्ये 150 हून अधिक नागरिक ठार झाल्यामुळे दहशतवाद ठेचून काढल्याचा पाकिस्तान सरकार आणि लष्कराचा दावा फोल ठरला असल्याची टीका स्थानिक वृत्तपत्रांनी केली आहे. 
 

इस्लामाबाद: पाकिस्तानमध्ये चार दिवसांत तीन दहशतवादी हल्ल्यांमध्ये 150 हून अधिक नागरिक ठार झाल्यामुळे दहशतवाद ठेचून काढल्याचा पाकिस्तान सरकार आणि लष्कराचा दावा फोल ठरला असल्याची टीका स्थानिक वृत्तपत्रांनी केली आहे. 

बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा या प्रातांमध्ये प्रचारसभांमध्ये झालेल्या या बॉंब हल्ल्यांमध्ये दोन नेत्यांसह 150 जण मारले गेले. पाकिस्तान सरकारने दहशतवाद नष्ट केल्याच्या दाव्याला पडलेला हा रक्तरंजित डाग असल्याचे "एक्‍स्प्रेस ट्रिब्यून'ने म्हटले आहे. पाकिस्तान पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईमुळे तेहरीके तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेची थोडी पीछेहाट झाली असली, तरी अद्यापही बॉंबहल्ले करण्याची त्यांची क्षमता शाबूत असल्याचेही या वृत्तपत्राने म्हटले आहे.

सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आल्याने येथे प्रचाराचा धुराळा उडत असतानाच हे हल्ले झाल्याने सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तर आहेच, पण सरकारच्या क्षमतेवरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत असल्याचे या वृत्तपत्राने म्हटले आहे. पाकिस्तान सरकारने सर्व सभा स्थानांना आणि उमेदवारांना तातडीने सुरक्षा पुरवावी, अशी मागणी "डॉन' वृत्तपत्राने केली आहे. दहशतवाद्यांवर विजय मिळविला असल्याची घोषणा पाकिस्तान सरकारने फार लवकर केली असून, त्यांचा फुगा फुटला असल्याचे "द न्यूज'ने म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Destruction of Terrorism are failed in pakistan