'डोनाल्ड लढवय्ये आहेत'; पतीच्या प्रचारासाठी मेलानिया ट्रम्प मैदानात

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 28 October 2020

अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत

वॉशिंग्टन- अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार आणि सध्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन आमने-सामने आहेत. दोन्ही नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प यांनीही पती डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचाराची धुरा हाती घेतली आहे. 

डोनाल्ड ट्रम्प लढवय्ये आहेत. ते अमेरिकेवर प्रेम करतात आणि देशातील नागरिकांसाठी ते प्रत्येक दिवशी लढत राहतील, असं मेलानिया म्हणाल्या आहेत. त्या पेनेसेल्वेनियातील जनतेशी एका रॅलीदरम्यान संवाद साधत होत्या. मेलानिया पहिल्यांदाच पती डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारासाठी एकट्याने मैदानात उतरल्या आहेत. त्या क्वचितच ट्रम्प यांच्या प्रचार रॅलीत दिसल्या आहेत. 

corona update: महामारीचा वेग मंदावला; सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी घट

काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पण झाले होते. त्यानंतर मेलानिया यांनी स्वत:ला क्वारंटाईन केले होते. उपचार घेतल्यानंतर त्या बऱ्या झाल्या आहेत. सभेत लोकांना संबोधित करताना मेलानिया म्हणाल्या की, ''कोरोनाची लागण झाल्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला पाठिंबा दिला, त्याबद्दल धन्यवाद. आता आम्हाला चांगलं वाटत आहे.''

अमेरिकेत आतापर्यंत कोरोनामुळे 225,000 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मेलानिया यांनी पीडित कुटुंबीयांबाबत करुणा व्यक्त केली. मला जाणीव आहे की, अनेकांनी आपल्या प्रिय व्यक्तींना गमावलं आहे. या कठिण काळात माझे विचार आणि प्रार्थना तुमच्या सर्वांसोबत आहेत, असं मेलानिया म्हणाल्या. डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटरवर व्यक्त होण्याच्या मुद्द्यांवरही त्यांनी भाष्य केलं. इतिहासात पहिल्यांदा असं घडतंय की, अमेरिकीतील नागरिक अध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट जोडले जात आहेत. दरम्यान, 3 नोव्हेंबर रोजी अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि ज्यो बायडेन यांच्यामध्ये चुरशीची लढत होईल, असं बोललं जातंय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Donald Is A Fighter said Melania Trump Hits Campaign Trail For Her Husband