डोनाल्ड ट्रम्प यांनी फोडला प्रचाराचा नारळ

वृत्तसंस्था
बुधवार, 19 जून 2019

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2020 मध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी काल (मंगळवार) पासून प्रचारास सुरूवात केली. फ्लोरिडामधून त्यांनी निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2020 मध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी काल (मंगळवार) पासून प्रचारास सुरूवात केली. फ्लोरिडामधून त्यांनी निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी सुमारे वीस हजार ट्रम्प समर्थक उपस्थित होते. डेमोक्रेटिक नेते देशाच्या अर्थव्यवस्थेचा नाश करू इच्छितात, तर बाकीचे जग अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची ईर्ष्या करते. त्यामुळे आपण मिळून अमेरिकेला पहिल्यापेक्षा अजून महान बनवूया, असे आवाहन ट्रम्प यांनी उपस्थितांना केले.

फ्लोरिडाच्या ओरलँडो येथून ट्रम्प यांनी प्रचार मोहीमेस सुरूवात केली. या वेळी ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया यांच्यासोबत परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. गेल्या वेळी रिपब्लिकन पक्षाला फ्लोरिडामध्ये प्रचंड यश मिळाले होते.

ट्रम्प म्हणाले, आम्ही अमेरिकेला पहिल्यापेक्षा महान बनविणार आहोत. आणि यासाठीच अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून येण्यासाठी मी अधिकृतपणे मोहिमेस सुरूवात करत आहे. कट्टरवादी डेमोक्रेटिक पक्षाचे नेते पूर्वग्रहाने ग्रासले गेले असून ते आपल्या देशाला नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि मी ते कधीही होऊ देणार नाही.

आपल्या भाषणात ट्रम्प यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यांविषयी, तसेच सरकारची आगामी धोरणे आणि व्यावसायिक दृष्टीकोनांबद्दल मते व्यक्त केली. राजकीय प्रतिस्पर्धी, काही प्रमुख माध्यम संस्था आणि गेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत रशियाच्या हस्तक्षेपांच्या अहवालांवर देखील ट्रम्प यांनी यावेळी टीका केली.

सर्वेक्षणात ट्रम्प पिछाडीवर
गेल्या आठवड्यात केल्या गेलेल्या एका सर्वेक्षण अहवालानुसार, माजी उपाध्यक्ष जो बिडेन यांना 53% मते आणि सँडर्स यांना 51% मते मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ट्रम्प यांच्या आवडत्या केबल नेटवर्क फॉक्स न्यूजचा अंदाज आहे की, ट्रम्प आणि बिडेन यांच्या मतांमध्ये 49-39 टक्के इतके अंतर राहील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Donald Trump ready for 2020 election starded election campaign