डोनाल्ड ट्रम्प यांच्या विवस्त्र पुतळ्याला लिलावात मिळाली 16.66 लाखांची किंमत

वृत्तसंस्था
शनिवार, 5 मे 2018

अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाकडून उभे होते. ते जिंकल्यानंतर पुतळ्याची किंमत वाढणार व तो खरेदी करण्यासाठी अनेक जण इच्छुक असतील, असा विश्‍वास होता. 

- डेरेन ज्युलियन, सीईओ, ज्युलियन ऑक्‍शन 
 

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सतत चर्चेत असतात. आता पुन्हा जगाचे लक्ष त्यांच्याकडे वेधले आहे. मात्र, याचे कारण ते स्वतः नसून त्यांचा पुतळा आहे. ट्रम्प यांचा हा साधासुधा नसून विवस्त्र पुतळा आहे. विशेष म्हणजे या पुतळ्याला लिलावात 16.66 लाख रुपये किंमत मिळाली आहे. 

अमेरिकेत 2016 मध्ये झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान शिल्पकार जिंजर यांनी ट्रम्प यांचे विवस्त्रावस्थेतील काही पुतळे बनविले होते. लॉस एंजिलिस, सॅन फ्रान्सिस्को, न्यूयॉर्क व क्विनलॅंडमधील सार्वजनिक ठिकाणी हे पुतळे ठेवले होते. हे पुतळे माती व सिलिकॉनपासून तयार केल्याचे जिंजर यांनी "वॉशिंग्टन पोस्ट'ला सांगितले. या प्रत्येक पुतळ्याचे वजन 80 पौंड आहे. मात्र चारपैकी तीन पुतळे फोडण्यात आले. ज्याचा लिलाव झाला, तो एकच पुतळा शिल्लक आहे. हा पुतळा लॉस एंजिलस येथील "हॉलिवूड बुलेवॉर्ड'मध्ये कडक सुरक्षेत ठेवलेला आहे. 

"ज्युलियन ऑक्‍शन'चे मुख्य कार्यकारी अधिकारी डेरेन ज्युलियन म्हणाले, की ट्रम्प यांचा विवस्त्र पुतळा खरेदी करण्यात अनेकांनी रस दाखविला होता. मात्र खुल्या पद्धतीने त्याची विक्री करायची असल्याने आम्ही त्याचा लिलाव केला. जॅक बेगन्स यांनी हा पुतळा 16.66 लाख रुपयांना विकत घेतला. बेगन्स यांना हा पुतळा लॉस एंजिलसमधील "हॉन्टेड म्युझियम'मध्ये ठेवायची इच्छा आहे. 

 

Web Title: Donald Trumps maiden statue fetches 16 66 lakh auction