ट्रम्प यांचा आदेश सूडबुद्धीने

वृत्तसंस्था
बुधवार, 29 मार्च 2017

हवामान बदलांसंदर्भात ओबामांनी घेतलेले निर्णय मागे घेण्यास मंजुरी

वॉशिंग्टन- हवामान बदलासंदर्भात अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी घेतलेले निर्णय मागे घेण्याबाबतच्या आदेशावर विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली. ट्रम्प यांच्या या निर्णयावर विरोधी पक्ष आणि पर्यावरणवाद्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. अत्यंत बेजबाबदारपणे आणि सूडबुद्धीने घेतलेला हा निर्णय असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.

हवामान बदलांसंदर्भात ओबामांनी घेतलेले निर्णय मागे घेण्यास मंजुरी

वॉशिंग्टन- हवामान बदलासंदर्भात अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी घेतलेले निर्णय मागे घेण्याबाबतच्या आदेशावर विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली. ट्रम्प यांच्या या निर्णयावर विरोधी पक्ष आणि पर्यावरणवाद्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. अत्यंत बेजबाबदारपणे आणि सूडबुद्धीने घेतलेला हा निर्णय असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.

पर्यावरण संरक्षण संस्थेच्या मुख्यालयात मंगळवारी ट्रम्प यांनी ओबामांच्या कार्यकाळात पर्यावरणासंदर्भात घेण्यात आलेले निर्णय मागे घेण्याबाबतच्या आदेशावर स्वाक्षरी केली. ट्रम्प यांचा हा निर्णय पर्यावरणाशी संबंधित असून, त्यामुळे त्याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. ""अमेरिकेतील ऊर्जेवर घालण्यात आलेले निर्बंध मागे घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्याबाबतच्या आदेशावर मी स्वाक्षरी केली आहे. या निर्णयामुळे ओबामा सरकारने घेतलेले निर्णय मागे घेण्यात येणार असून, अनेक नोकऱ्या वाचविण्यात येणार आहेत,'' असे ट्रम्प या वेळी म्हणाले.

अमेरिकेतील संपत्ती आणि नोकऱ्यांमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने मी घेतलेला निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अमेरिकेतील संपत्तीची लूट थांबविण्यावर आम्ही शिक्कामोर्तब केले असून, आमच्या देशाची नव्याने बांधणी करण्यास आम्ही सुरवात केली आहे, असेही ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांच्या निर्णयावर बोलताना "व्हाइट हाउस'चे माध्यम सचिव सिन स्पायसर म्हणाले की, स्वच्छ हवा आणि पाणी मिळविण्यासाठी आर्थिक विकासाला बाधा पोचविण्याची प्रक्रिया या आदेशामुळे समाप्त होईल. तसेच, स्वच्छ हवा आणि पाण्याच्या बदल्यात केली जाणारी नोकर कपात रोखण्यातही यश मिळेल.

ट्रम्प यांच्या नव्या आदेशानुसार ओबामा यांनी पर्यावरणासंदर्भात घेतलेले सर्व निर्णय, लागू केलेले नियम, धोरणे आणि मार्गदर्शक तत्त्वे आदींचा आढावा घेऊन त्यावर पुनर्विचार करावा, असे सर्व विभाग आणि संस्थांना कळविण्यात आले आहे.

पर्यावरणावर घाला
पर्यावरणाबाबतचे ओबामा यांच्या सरकारने घेतलेले निर्णय मागे घेण्याचा ट्रम्प यांचा आदेश म्हणजे पर्यावरणावर सूडबुद्धीने घातलेला घाला असल्याची टीका विरोधी डेमोक्रॅटिक पक्षासह पर्यावरणाशी संबंधित अनेक गटांनी केली आहे. ""स्वच्छ ऊर्जेवर आधारित अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी मागील काही दशके करण्यात आलेल्या कामावर पाणी ओतण्याचा हा प्रकार आहे,'' अशी जळजळीत टीका भारतीय वंशाचे कॉंग्रेस सदस्या ऍमी बेरा यांनी केली. अमेरिकी संसदेच्या विज्ञान, अवकाश आणि तंत्रज्ञानविषयक समितीच्या उपसमितीचे ज्येष्ठ सदस्य असलेले अमरीश बाबूलाल ऊर्फ ऍमी बेरा हे भौतिकशास्त्रज्ञ आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: donald Trump's order revengefully