डोनाल्ड ट्रम्प यांचे टि्वट डिलीट; फेसबुक, टि्वटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटही सस्पेंड

सकाळ ऑनलाइन टीम
Thursday, 7 January 2021

टि्वटरने ट्रम्प यांचे काही टि्वटस डिलीट केले असून त्यांचे टि्वटर अकाऊंट 12 तासांसाठी सस्पेंड करण्यात आले आहे.

वॉशिंग्टन- अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत जो बायडन यांच्या विजयाच्या घोषणेनंतरही विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अजूनही आपला पराभव मान्य करण्यास तयार नाहीत. त्याचे प्रत्यंतर यूएस कॅपिटलमध्ये (संसद) हिंसाचारात झाल्याचे दिसून आले आहे. या हिंसाचारात एका महिलेचा मृत्यूही झाल्याचे वृत्त आहे. अभूतपूर्व गोंधळानंतर वॉशिंग्टनमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्याचबरोबर टि्वटरने ट्रम्प यांचे काही टि्वटस डिलीट केले असून त्यांचे टि्वटर अकाऊंट 12 तासांसाठी सस्पेंड करण्यात आले आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंटनेही ट्रम्प यांचे अकाऊंट काही कालावधीसाठी बंद केले आहे. 

टि्वटरने म्हटले आहे की, वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या अभूतपूर्व हिंसाचाराच्या स्थिती पाहता डोनाल्ड ट्र्रम्प यांनी आपले तीन टि्वट्स हटवले पाहिजेत. हे टि्वट्स आमच्या 'नागरी अखंडता धोरणा'चे उल्लंघन करत आहेत. जर ट्रम्प यांनी हे टि्वट हटवले नाही तर त्यांचे अकाऊंट लॉक राहील. त्याचबरोबर जर त्यांनी पुन्हा टि्वटरच्या धोरणाचे उल्लंघन केले तर त्यांचे अकाऊंट कायमस्वरुपीही बंद केले जाऊ शकते, असा इशाराही टि्वटरने दिला आहे. 

हेही वाचा- ट्रम्प समर्थकांकडून अमेरिकेच्या संसदेत तोडफोड; अभुतपूर्व असा गोंधळ

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या समर्थकांना दिलेल्या मेसेजमुळेच हिंसाचार उफाळला असल्याचा आरोप आहे. ट्रम्प यांचे हे मेसेजस टि्वटर, फेसबुक आणि यूट्यूबनेही हटवले आहेत. ट्रम्प यांनी यूएस कॅपिटल येथे जमा झालेल्या आपल्या समर्थकांना घरी जाण्याचे आवाहन केले होते. त्यांनी निवडणुकीत घोटाळा झाल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार केला होता. 

टि्वटरबरोबर फेसबुकनेही 24 तासांसाठी ट्रम्प यांच्या पेजचे फिचर्स ब्लॉक केले आहेत. याचाच अर्थ या कालावधीत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रम्प यांना कोणतीच पोस्ट करता येणार नाही. ट्रम्प यांच्या पेजवरील मजकूर हा फेसबुकच्या धोरणाचे उल्लंघन असल्याचे सांगण्यात आले आहे. ट्रम्प यांच्या मेसेजमुळे परिस्थिती नियंत्रणात येण्याऐवजी बिघडण्याची शक्यता आहे, असे फेसबुकने म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Donald trumps Twitter Facebook Instagram account suspend after violence Of US Capitol