टोकियोत आजपासून ‘एज्युकॉन’ परिषद

डॉ. बाळ ज. बोठे पाटील 
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे उद्यापासून (ता. २४) ‘एज्युकॉन २०१९’ ही दोन दिवसांची परिषद होत आहे. कौशल्यविकास व शिक्षणाबाबत या परिषदेमध्ये विचारमंथन होणार आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञ परिषदेत मार्गदर्शन करतील.

टोकियो (जपान) - ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आजपासून (ता. २४) ‘एज्युकॉन २०१९’ ही दोन दिवसांची परिषद होत आहे. कौशल्यविकास व शिक्षणाबाबत या परिषदेमध्ये विचारमंथन होणार आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञ परिषदेत मार्गदर्शन करतील.

‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेत विविध विद्यापीठांचे कुलगुरू, प्रमुख उच्च शिक्षण संस्थांचे संचालक, शिक्षणासह आर्थिक, औद्योगिक,  व्यावसायिक क्षेत्रातील प्रमुख सहभागी होत आहेत शिक्षणासह विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना एकाच व्यासपीठावर आणून उच्च शिक्षणाच्या पद्धतीत बदल घडवून आणण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूह’ २००५ पासून ‘एज्युकॉन’च्या माध्यमातून प्रयत्नशील आहे. गेल्या १५ वर्षांपासून सुरू असलेल्या ‘एज्युकॉन’ची ख्याती सर्वदूर पोचली आहे. जगभरातील शैक्षणिक जगताची माहिती जाणून घेण्यासाठी आतापर्यंत थायलंड, श्रीलंका, मलेशिया, संयुक्त अरब अमिराती, चीन, तुर्कस्तान, फ्रान्स, जर्मनी, इस्राईल, सिंगापूर व रशिया या देशांमध्ये ही परिषद झाली आहे.

येथील ग्रॅंड प्रिन्स हॉटेलच्या सभागृहात आजपासून सुरू होत असलेल्या एज्युकॉन या शिक्षण परिषदेची ‘कौशल्यविकास व शिक्षण’ ही संकल्पना आहे. याबाबत जपानच्या पंतप्रधानांचे सल्लागार संजीव सिन्हा, जपानचे भारतातील माजी राजदूत हिराबायाशी, जपान-इंडो चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष निशीमोटो, जपान सायन्स व टेक्‍नॉलॉजीचे डॉ. निशीकामा, जपानमधील साईटामा विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. नौमुरा, टोकियो विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. योशिनो व आयआयटी कानपूरचे माजी संचालक डॉ. संजय धांडे आदी मार्गदर्शन करणार आहेत.

देशभरातील तज्ज्ञांची उपस्थिती!
एज्युकॉन परिषदेत एकंदर सात सत्रांमध्ये ‘कौशल्यविकास व शिक्षण’ या विषयांसंदर्भात चर्चा होईल. त्यामध्ये राज्याच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्यासह देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग राहणार आहे. मुळा एज्युकेशन सोसायटी, आसरा फाउंडेशन, यशवंत कृषी, ग्राम व पाणलोट विकास संस्था, वृद्धेश्‍वर मल्टिस्टेट, स्वामी विवेकानंद विद्या प्रसारक मंडळ, कराळे कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट, आंतरभारती रुरल इंटरनॅशनल मेडिकल एज्युकेशन ट्रस्ट, अजिंक्‍य डी. वाय. पाटील विद्यापीठ, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल व रिसर्च, चौधरी अतारसिंग यादव मेमोरिअल एज्युकेशन ट्रस्ट, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पुणे), न्यू कळंबोली एज्युकेशन सोसायटी, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, अलर्ड चॅरिटेबल ट्रस्ट, चॅरिटेबल एज्युकेशन सोसायटी, के. के. वाघ एज्युकेशन सोसायटी (नाशिक), डॉ. डी. वाय. पाटील टेक्‍निकल कॅम्पस, ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटी, विश्‍वकर्मा विद्यापीठ, विश्‍वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्‍नॉलॉजी, विश्‍वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी, सिंहगड टेक्‍निकल एज्युकेशन सोसायटी, प्रबोधन बहुउद्देशीय संस्था, स्पेक्‍ट्रम ॲकॅडमी आदी संस्था या परिषदेत सहभागी झाल्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: educon 2019 conference begins today in Tokyo

टॅग्स