मंदीचा सर्वाधिक फटका भारताला; 90 टक्‍के जग कचाट्यात

Effects of global slowdown more pronounced in India
Effects of global slowdown more pronounced in India

वाशिंग्टन : विकसनशील बाजारापेठांपैकी एक असलेल्या भारतात जागतिक मंदीचे सर्वाधिक परिणाम दिसून येत आहेत, अशी माहिती आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या नव्या व्यवस्थापकीय संचालिका क्रिस्तालिना जॉर्जियाव्हा यांनी दिली. मंदीच्या कचाट्यात 90 टक्के जग सापडले असून, यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचा वृद्धिदर कमी होईल, अशी शक्‍यताही त्यांनी व्यक्त केली आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून जागतिक अर्थव्यवस्थेची वाढ खुंटली आहे. यंदाचा विकासदर हा दशकभराचा नीचांकी स्तरावर जाईल. पुढील आठवड्यात आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडून 2019 आणि 2020 या वर्षांसाठीचा आर्थिक अंदाज अहवाल जाहीर होणार आहे. बहुतांश अर्थव्यवस्थांना मंदीचा फटका बसेल, असा अंदाज जॉर्जियाव्हा यांनी व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय नाणे निधी आणि जागतिक बॅंकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या विशेष कार्यक्रमात जॉर्जियाव्हा बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, सर्वत्र विकासदर खुंटला असला, तरी 40 विकसनशील अर्थव्यवस्थांचा विकासदर (जीडीपी) पाच टक्‍क्‍यांवर राहील. यात 19 अर्थव्यवस्था सहारा उपखंडातील असतील. अमेरिका, जर्मनी आदी देशांमध्ये बेरोजगारी विक्रमी पातळीवर आहे. विकसित देशांचा विचार करता अमेरिका, जपान, युरोपातील काही देशांमधील आर्थिक घडामोडी संथ झाल्याचे दिसून आले आहे. 

नुकताच रिझर्व्ह बॅंकेने चालू वर्षाचा विकासदराचा अंदाज घटवला होता. तो 6.9 टक्‍क्‍यांवरून 6.1 टक्के केला होता. विकासाला चालना देण्यासाठी विकसनशील अर्थव्यवस्थांनी सुधारणांचा धडाका लावणे आवश्‍यक आहे. पतधोरणातून व्यापक वित्तीय स्थैर्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेसाठी द्विपक्षीय सहकार्य, व्यापार, वित्तीय तंत्रज्ञान सेवांचा स्वीकार, करचुकवेगिरीशी लढा आणि दहशतवाद्यांची आर्थिक नाकेबंदी आदी विषयांवर एकमेकांच्या समन्वयातून मार्ग काढला पाहिजे, असे जॉर्जियाव्हा यांनी सांगितले. 

चालू वर्षात मंदीमुळे तब्बल 90 टक्के जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीवर परिणाम होईल. जागतिक अर्थव्यवस्था एकत्रितपणे मंदीच्या कचाट्यात सापडली आहे. - क्रिस्तालिना जॉर्जियाव्हा, व्यवस्थापकीय संचालिका, आंतरराष्ट्रीय नाणे निधी

नाणे निधीची प्रमुख निरीक्षणे 
90 टक्‍के जग मंदीच्या प्रभावात 
चीनच्या विकासदरात झपाट्याने घसरण 
भारत आणि ब्राझील यांना मंदीचा मोठा फटका 
हवामानबदलाबाबत पुढाकार आवश्‍यक 
व्यापाराचा तिढा सोडविण्याची गरज 
विकसनशील अर्थव्यवस्थांनी सुधारणांवर भर द्यावा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com