निवडणुकांबाबत न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी घेतला मोठा निर्णय

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 17 August 2020

ऑकलंडमधील लॉकडाऊन वाढविण्यात आल्यामुळे जनतेमध्ये चिंतेचे वातावरण पसरल्याचे अर्डेर्न यांनी सांगितले. 

वेलिंग्टन- कोरोनाचे पुनरागमन झाल्यामुळे न्यूझीलंडमधील निवडणूक लांबणीवर टाकण्याचा निर्णय पंतप्रधान जेसिंडा अर्डेर्न यांनी घेतला. 19 सप्टेंबरची निवडणूक चार आठवड्यांनी लांबणीवर टाकण्यात आली. आता 17 ऑक्टोबर ही नवी तारीख ठरली आहे.  गेल्या मंगळवारी ऑकलंडमध्ये एका कुटुंबातील चार जणांना संसर्ग असल्याचे निदान झाले. रविवारअखेर नव्या रुग्णांचा आकडा 49 पर्यंत गेला होता. त्याआधी 102 दिवसांच्या कालावधीत एकाही नव्या रुग्णाची नोंद झाली नव्हती. ऑकलंडमधील लॉकडाऊन वाढविण्यात आल्यामुळे जनतेमध्ये चिंतेचे वातावरण पसरल्याचे अर्डेर्न यांनी सांगितले. 

ऑकलंड हे न्यूझीलंडमधील सर्वांत मोठे शहर आहे. तेथील नागरिकांना मतदान करण्यात अडथळे येण्याची शक्यता होती. काही जण मतदानास मुकण्याचीही शक्यता होती. या पार्श्वभूमीवर अर्डेर्न यांनी आपल्या लेबर पार्टीचे नेते तसेच निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी गेला आठवड्याअखेर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी उपलब्ध असलेली सर्वांत आधीची तारीख नक्की केली. 

रशियाच्या कोरोना लशीची पहिली बॅच तयार; चीननेही दिली 'गुड न्यूज'

विरोधकांची मागणी 

प्रचारावर बंधने आल्यास सरकारच्या बाजूने निवडणूक अनुचितपणे झुकेल अशी चिंता विरोधकांना वाटत होती. नॅशनल पार्टी या मुख्य विरोधी पक्षाने किमान नोव्हेंबरपर्यंत किंवा शक्य तर पुढील वर्षापर्यंत निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली होती. 

मतदानाची तारीख बदलण्यात आल्यामुळे आता सर्व पक्ष समान परिस्थितीत प्रचार करतील. सर्व पक्षांना नऊ आठवड्यांचा वेळ आहे, तसेच निवडणूक आयोगालाही तयारीसाठी पुरेसा कालावधी मिळेल यानंतर परिस्थिती कशीही असली तरी तारखेत बदल होणार नाही, असं पंतप्रधान जेसिंडा अर्डेर्न यांनी सांगितलं.

शाळा, कॉलेज सुरू करा; सुप्रीम कोर्टात न्यायाधीशांचे म्हणणे 

जनतेची पसंती 

- जेसिंडा अर्डेर्न यांच्या लोकप्रियतेचे मानांकन 60 टक्क्यांपर्यंत वाढले 
- कोरोनामुक्त झाल्याची घोषणा सर्वांत आधी केलेल्या निवडक देशांत न्यूझीलंडचा समावेश 
- सात आठवड्यांच्या लॉकडाऊनमध्ये बाधित रुग्णांचे विलगीकरण, त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा तपास, व्यापक चाचण्या अशा उपायांचा अवलंब 
- कोरोना हाताळणीशिवाय ख्राईस्टचर्चमधील मशिदीवरील हल्ला आणि व्हाईट आयलंड ज्वालामुखीचा उद्रेक अशा घडामोडींच्या कालावधीत खंबीर नेतृत्व 

भागीदाराची गरज... 

सध्याच्या सरकारमध्ये लेबर पार्टीची ग्रीन्स आणि न्यूझीलंड फर्स्ट (एनझेडएफ) या दोन पक्षांबरोबर युती आहे. अर्थात हे पक्ष सत्तेतील छोटे भागीदार आहेत. यावेळी जेसिका अर्डेर्न यांच्या कुशल नेतृत्वामुळे लेबर पार्टी निर्विवाद बहुमत मिळवेल असा राजकीय तज्ञांचा अंदाज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Elections in New Zealand postponed said pm Jacinda Ardern