संबंध दृढ करण्यावर भर

पीटीआय
Friday, 15 November 2019

प्रजासत्ताक दिनाचे बोल्सोनारो प्रमुख पाहुणे
भारताच्या पुढील वर्षीच्या प्रजासत्ताक दिनासाठी ब्राझीलचे अध्यक्ष जेर बोल्सोनारो हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी बोल्सोनारो यांना याबाबत दिलेले निमंत्रण त्यांनी आज स्वीकारले. अकराव्या ‘ब्रिक्‍स’ परिषदेनिमित्त येथे आलेल्या मोदी आणि बोल्सोनारो यांची आज स्वतंत्रपणे भेट घेत दहशतवादविरोधी मोहीम आणि इतर विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

पंतप्रधान मोदींनी घेतल्या भेटीगाठी; निमंत्रणांची देवाणघेवाण
ब्राझीलिया - अकराव्या ब्रिक्‍स परिषदेसाठी येथे आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भेटीगाठींवर भर दिला. त्यांनी आज सहभागी देशांच्या प्रमुखांची स्वतंत्रपणे भेट घेत विविध द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करत संबंध दृढ करण्यासाठी प्रयत्न केले.

ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचे प्रमुख या परिषदेसाठी येथे आले असून, प्रादेशिक आर्थिक विकास आणि दहशतवादविरोधी मोहीम या मुद्द्यांवर परिषदेत प्रामुख्याने चर्चा होणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी आज चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची स्वतंत्रपणे भेट घेत चर्चा केली. सुमारे महिनाभरापूर्वीच या दोन नेत्यांमध्ये चेन्नई येथे अनौपचारिक चर्चा झाली होती. द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठीच्या प्रयत्नांबाबत या दोघांनी आज चर्चा केली. चीनने प्रस्तावित केलेल्या प्रादेशिक सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी गटात सहभागी होण्यास भारताने काही दिवसांपूर्वीच नकार दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर ही भेट झाली. जिनपिंग यांनी भारत-चीनदरम्यान चीनमध्ये होणाऱ्या तिसऱ्या अनौपचारिक चर्चेचे मोदींना आमंत्रण दिले. 

ब्राझीलचा ओढा चीनकडे
चीन हा ब्राझीलच्या भविष्याचा भाग बनत आहे, असे विधान ब्राझीलचे अध्यक्ष जेर बोल्सोनारो यांनी आज केले. ब्राझील आणि चीनदरम्यान आज वाहतूक, सेवा आणि गुंतवणुकीबाबत अनेक करार झाले. बोल्सोनारो हे डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे मित्र आहेत. ब्राझीलमधील कृषी क्षेत्रांतून त्यांच्यावर चीनशी चांगले संबंध ठेवण्यावर दबाव आहे. गेल्या वर्षी त्यांनी चीनच्या ब्राझीलमधील वाढत्या गुंतवणुकीवर टीका केल्यावर उद्योगांकडून त्यांच्यावर दबाव वाढला होता. 

अँटिव्हायरस कार्यक्रम हवा
माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची व्याप्ती प्रचंड वाढली असल्याने ‘ब्रिक्‍स’ देशांनी माहिती सुरक्षिततेसाठी सहकार्य करण्याचे आणि त्यासाठी मूलभूत अँटिव्हायरस कार्यक्रम राबविण्याचे आवाहन रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी आज केले. तसेच, आपापल्या देशांमधील छोट्या आणि मध्यम उद्योगांच्या मदतीसाठी माहितीची देवाणघेवाण करण्याचे जाळे निर्माण करण्याचा प्रस्तावही पुतीन यांनी ठेवला. पुतीन यांनी मोदींना पुढील वर्षीच्या रशियात होणाऱ्या ‘विजय दिना’चे निमंत्रण दिले असून मोदींनी ते स्वीकारले आहे. या दोघांमध्ये झालेल्या चर्चेत संबंध दृढ करण्यावर भर देण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Emphasis on strengthening relationships narendra modi