Europe Parliament : युरोपीय संसदेत ‘उजव्यां’चा प्रभाव; अनेकांचा मानहानिकारक पराभव

जगभरात उजव्या विचारसरणीच्या राजकारणाचा प्रभाव पडत असल्याचे प्रतिबिंब युरोपीय महासंघाच्या संसदीय निवडणुकीतही पडले आहे.
emmanuel macron and giorgia meloni
emmanuel macron and giorgia melonisakal

ब्रुसेल्स - जगभरात उजव्या विचारसरणीच्या राजकारणाचा प्रभाव पडत असल्याचे प्रतिबिंब युरोपीय महासंघाच्या संसदीय निवडणुकीतही पडले आहे. युरोपीय संसदेतील ७२० जागांसाठी युरोपातील विविध देशांमध्ये रविवारी झालेल्या मतदानामध्ये उजव्या विचारसरणीच्या गटांनी पारंपरिक गटांना चांगलाच धक्का दिला असल्याचे स्पष्ट होत आहे. फ्रान्समध्ये तर सत्ताधारी पक्षाचा मानहानिकारक पराभव झाल्याचा धक्का बसलेल्या अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी देशात मुदतपूर्व निवडणूक जाहीर केली.

युरोपीय संसदेसाठी रविवारी मतदान झाले आणि मतमोजणी सुरू झाली आहे. अद्यापही मतमोजणी पूर्ण झालेली नसली तरी काही निकाल जाहीर झाले आहेत. संसदेमध्ये उजव्या विचारसरणीच्या सदस्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या पक्षाच्या जागाही दुपटीने वाढल्या आहेत.

तसेच, भ्रष्टाचाराचे आरोप होऊनही जर्मनीमधील ‘अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी’ने चांगले यश मिळवित चॅन्सलर ओलाफ शोल्झ यांच्या सोशल डेमोक्रॅट्‌स पक्षाला मागे टाकले आहे. स्थलांतराला विरोध हा युरोपीय संसदेच्या निवडणुकीतील महत्त्वाचा मुद्दा ठरला. त्यामुळे राष्ट्रवादी विचारसरणीच्या पक्षांना लोकांनी पसंती दिल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. या पक्षांचा प्रभाव वाढल्याने पर्यावरण बदल आणि कृषी धोरणांसह विविध मुद्द्यांवर कायदे मंजूर करवून घेताना अनेक अडचणी येणार असल्याचा अंदाजही वर्तविण्यात येत आहे.

फ्रान्समध्ये मुदतपूर्व निवडणूक

पॅरिस - युरोपीय निवडणुकीत मानहानिकारक पराभव झाल्याने फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी देशाचे कनिष्ठ सभागृह विसर्जित करत निवडणूक जाहीर केली आहे. त्यांच्या या घोषणेने फ्रान्सच्या जनतेला धक्का बसला असून तीन आठवड्यांतच त्यांना मतदानासाठी पुन्हा बाहेर पडावे लागणार आहे.

युरोपीय संसदेच्या निवडणुकीत मॅक्रॉन यांच्या रेनेसान्स पक्षाला केवळ १५ टक्के मते मिळाली, तर नॅशनल रॅली या उजव्या विचारसरणीच्या पक्षाला ३१ ते ३२ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. मॅक्रॉन यांच्या घोषणेनुसार फ्रान्समध्ये ३० जून आणि ७ जुलैला निवडणूक होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com