सायबर हल्ल्यांबद्दल ‘ईयू’चे निर्बंध जारी; रशिया, चीन आणि उ. कोरियामधील व्यक्ती दोषी 

पीटीआय
Monday, 3 August 2020

२०१७ मधील ‘वॉना क्राय’ रॅनसमवेअर, नॉटपेट्या मालवेअर आणि क्लाउड हॉपर हेरगिरी मोहिमेबद्दल एकूण सहा व्यक्ती आणि तीन संघटनांना दोषी धरत त्यांच्यावर निर्बंध लागू केले आहेत.  ‘ईयू’ने या सर्वांवर प्रवास बंदी लागू करतानाच त्यांची मालमत्ताही गोठवली आहे.

ब्रुसेल्स -  युरोपीय समुदायाने (ईयू) सायबर हल्ल्यांसाठी प्रथमच निर्बंध जारी करताना रशियाच्या लष्करातील काही अधिकारी, चीनमधील सायबर हल्लेखोर आणि उत्तर कोरियामधील एका कंपनीसह काही संस्थांना ‘ईयू’ने जबाबदार धरले आहे. 

२०१७ मधील ‘वॉना क्राय’ रॅनसमवेअर, नॉटपेट्या मालवेअर आणि क्लाउड हॉपर हेरगिरी मोहिमेबद्दल एकूण सहा व्यक्ती आणि तीन संघटनांना दोषी धरत त्यांच्यावर निर्बंध लागू केले आहेत. ‘ईयू’ने या सर्वांवर प्रवास बंदी लागू करतानाच त्यांची मालमत्ताही गोठवली आहे. दोषी संस्थांना कोणत्याही प्रकारचा निधी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या दिला जाऊ नये, असे आवाहन ‘ईयू’चे परराष्ट्र धोरण प्रमुख जोसेफ बॉरेल यांनी सांगितले.

जगभरातील घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रशियातील लष्करी गुप्तहेर संघटना ‘ग्रु’च्या चार सदस्यांवर नेदरलँडमधील रासायनिक शस्त्रांच्याविरोधात काम करणाऱ्या एका संस्थेचे वाय-फाय हॅक केल्याचा आरोप आहे. ही संस्था सीरियामध्ये रासायनिक शस्त्रांचा वापर झाल्याच्या आरोपाचा तपास करत आहे. युक्रेनबरोबर आर्थिक व्यवहार करणाऱ्या अनेक कंपन्यांना लक्ष्य करताना नॉटपेट्या मालवेअरचा वापर केल्याबद्दलही ‘ग्रु’वर निर्बंध घालण्यात आले आहेत.२०१५ ते २०१६ या काळातील त्यांच्या या कृतीमुळे लक्षावधी डॉलरचे नुकसान झाले होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

चीनच्या दोन हॅकरनी ऑपरेशन क्लॉउड हॉपरद्वारे क्लाउड सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांच्या माहितीचा अनधिकृत ॲक्सेस मिळवत युरोपसह जगभरातील अनेक कंपन्यांचे प्रचंड नुकसान केले होते. ‘ईयू’ने उत्तर कोरियामधील चोसून एक्स्पो या कंपनीवरही निर्बंध घातले आहेत. या कंपनीने ‘वॉना क्राय’ रॅनसमवेअरला पाठिंबा दिला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: European Union restrictions issued About cyber attacks

Tags
टॉपिकस
Topic Tags: