युरोपीय समुदायाकडून अमेरिकेच्या उत्पादनांवर जादा कर

वृत्तसंस्था
शनिवार, 23 जून 2018

युरोपीय समुदायातील 28 देशांसोबत स्वहित रक्षणासाठी अन्य कोणताही पर्याय राहिला नव्हता. त्यामुळे अमेरिकेच्या अन्यायी निर्णयाविरुद्ध हे जादा कर आकारण्याचे पाऊल उचलण्यात आले आहे. 
- सेसिलिया मॅल्मस्ट्रॉम, व्यापार आयुक्त, युरोपीय समुदाय 

ब्रुसेल्स (एएफपी) : अमेरिकेच्या बरबॉन, जीन्स आणि दुचाकींसह अनेक उत्पादनांवर युरोपीय समुदायाने जादा करआकारणी केली आहे. अमेरिकेने युरोपातील पोलाद आणि ऍल्युमिनियमवर जादा कर आकारल्याने प्रत्युत्तर म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. यामुळे अमेरिकेशी युरोपीय समुदायाने खुले व्यापारयुद्ध सुरू केल्याचे मानले जात आहे. 

युरोपीय समुदायाने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या उत्पादनांवरील जादा कर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. अमेरिकेच्या उत्पादनांवर जादा करआकारणी झाल्याने युरोपमधील 28 देशांतील बाजारपेठांमध्ये अमेरिकेच्या उत्पादनांचे दर आता वाढणार आहेत. अमेरिकेच्या 2.8 अब्ज युरोंच्या (3.3 अब्ज डॉलर) उत्पादनांवर जादा कर आकारण्यात येईल. यामध्ये अमेरिकेच्या दुचाकी, बरबॉन आणि जीन्स या उत्पादनांचा प्रामुख्याने समावेश असेल. 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्‍सिको आणि कॅनडासह अन्य सहकारी देशांच्या उत्पादनांवर जादा कर आकारून व्यापार युद्धाची सुरवात आधीच केली आहे. यामुळे जागतिक पातळीवर व्यापारयुद्ध छेडले गेले असून, याचा फटका जागतिक अर्थव्यवस्थेला बसणार आहे. कालच (ता.21) भारताने अमेरिकेच्या उत्पादनांवर जादा कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने भारतातील पोलाद आणि ऍल्युमिनियमवर जादा कर आकारल्याने भारताने अमेरिकेच्या उत्पादनांवर जादा कर आकारण्याचे पाऊल उचलले. 

या उत्पादनांवर जादा कर 

दुचाकी, बरबॉन, जीन्स, क्रॅनबेरी, क्रॅनबेरी ज्यूस, पिनट बटर, मोसंबी ज्यूस, मका, चामड्याची पादत्राणे, कपडे, सौंदर्यप्रसाधने, पोलाद उत्पादने
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Extra taxes on American products from European communities