फेसबुक आता नव्या रूपात

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 May 2019

इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करणे सोपे
इन्स्टाग्रामवरही कॅमेरा इंटरफेसमध्ये क्रिएट मोड असा पर्याय देण्यात आल्याने आता तेथेच छायाचित्रे संपादित करणे, त्यात गरजेनुसार अक्षरे लिहिणे, फोटो शेअर करणे सोपे होणार आहे. फोटो किंवा व्हिडीओला मिळालेले लाईक्‍स लपवण्यासाठी पर्याय देण्याचा विचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. जेणेकरून लाईक्‍सचा विचार न करता फक्त फोटो अपलोड करण्यावर जास्त भर देता येणार आहे. हे बदल अद्ययावत अँड्रॉईड आणि आयफोनवर उपलब्ध होणार असून, डेस्कटॉप वापरकर्त्यांना काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

सॅन जोस - ‘व्हॉट्‌सॲप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम या समाजमाध्यमांवरील संभाषण आणि डाटाच्या गोपनीयतेच्या अधिक सुरक्षिततेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी बुधवारी एफ-८ या फेसबुकच्या वार्षिक तंत्रज्ञान परिषदेत स्पष्ट केले. झुकरबर्ग यांनी या वेळी फेसबुकचे नवे डिझाईन प्रसिद्ध केले. त्यामध्ये फेसबुकच्या न्यूज फीडमध्ये आकर्षक बदल करण्यात आले आहेत. या बदलांमध्ये फेसबुकने डेटाच्या गोपनीयतेवर अधिक भर दिला आहे. या नवीन बदलाला एफबी-५ असे नाव देण्यात आले आहे.

‘जगात अनेक वापरकर्त्यांकडून गोपनीयतेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. त्यांचा विश्‍वास वाढावा, यासाठी फेसबुक अद्ययावत करण्यात येत असल्याचे झुकरबर्ग यांनी स्पष्ट केले. फेसबुकने केलेल्या बदलांमध्ये ग्रुप आणि इव्हेंटला अधिक अधोरेखित केले आहे. एखादा युजर्स ग्रुपमध्ये सहभागी झाल्यास त्याला ग्रुपसंबंधातील ‘नोटिफिकेशन्स’ प्राप्त होतील. 

वापरकर्त्यांना ग्रुप इंटरॅक्‍शनचा पर्यायही उपलब्ध असेल. अनोळखी व्यक्तींना शोधण्यासाठी किंवा आपल्या शाळा, महाविद्यालये, कार्यालयांतील व्यक्तींना शोधण्यासाठी ‘मीट न्यू फ्रेंड्‌स’ असा पर्याय असेल. 

‘फेसबुक डेटिंग’मधील ‘सिक्रेट क्रश’ या पर्यायामुळे एखाद्याने तुम्हाला त्याच्या सिक्रेट क्रश यादीत सहभागी केल्यास त्यासंबंधी कल्पना फेसबुकडून तुम्हाला देण्यात येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Facebook now has a new look