फेसबुकला बसला तब्बल पाच अब्ज डॉलरचा दंड!

वृत्तसंस्था
रविवार, 14 जुलै 2019

केंब्रिज ऍनालिटिकाने कोट्यवधी फेसबुक युझरचा डेटा चोरल्याचा प्रकार समोर आल्यानंतर या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची घोषणा 'एफटीसी'ने गेल्या वर्षी केली होती. 
 

नवी दिल्ली : डेटा संरक्षणातील त्रुटी, तसेच सोशल नेटवर्कच्या गोपनियतेचे उल्लंघन केल्याप्रकरणी 'फेसबुक'ला तब्बल पाच अब्ज डॉलरचा (सुमारे 35 हजार कोटी) दंड ठोठावण्यास अमेरिकेतील नियामकाने मंजुरी दिली आहे. एखाद्या टेक कंपनीला ठोठावलेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा दंड आहे. 

याबाबत वॉल स्ट्रिट जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, फेसबुकला हा दंड ठोठावण्यास अमेरिकेच्या फेडरल ट्रेड कमिशनने (एफटीसी) 3-2 मतांनी मंजुरी दिली असून, ही रक्कम वसूल करण्यासाठी नियामकाला येथील न्याय विभागाची मंजुरी आवश्‍यक आहे. युझरच्या डेटाचा वापर करण्यासंदर्भात फेसबुकवर काही मर्यादा घालण्यात आल्या असून, त्याचा तपशील अद्याप उघड झाला नसल्याचेही या वृत्तात नमूद आहे. या दंडामुळे फेसबुकच्या वर्तनात सुधारणा होण्याची शक्‍यता कमीच असल्याचे टीकाकारांनी म्हटले आहे. 

दरम्यान, केंब्रिज ऍनालिटिकाने कोट्यवधी फेसबुक युझरचा डेटा चोरल्याचा प्रकार समोर आल्यानंतर या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची घोषणा 'एफटीसी'ने गेल्या वर्षी केली होती. 

फारसा फरक नाही ! 
दंडाची रक्कम मोठी असली तरी फेसबुकची त्यासाठी अगोदरपासून तयारी होती. हा दंड 3 ते 5 अब्ज डॉलरदरम्यान असेल, असा अंदाज फेसबुकने बांधला होता. दंडाची घोषणा झाल्यानंतर शुक्रवारी फेसबुकच्या शेअरचे मूल्य 1.8 टक्‍क्‍याने वधारले.

शिवाय या वर्षातील पहिल्या तिमाहीत कंपनीने 2.4 अब्ज डॉलरचा नफा नोंदवला असून, महसूल 26 टक्‍क्‍यांनी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे 5 अब्ज डॉलरच्या दंडाने कंपनीवर फारसा परिमाण होणार नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Facebook seizes 5 billion dollar penalty