
FBI Raid at Former US National Security Advisor’s Residence: अमेरिकेतून एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि संयुक्त राष्ट्रांमधील अमेरिकेचे राजदूत जॉन बोल्टन यांच्या घरावरच एफबीआयने छापा टाकला आहे. न्यू यॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, शुक्रवारी सकाळी सात वाजता एफबीआय एजंटांनी मेरीलँडच्या बेथेस्डा भागात बोल्टन यांच्या घरावर छापा टाकला.
हे प्रकरण त्यांच्या 'द रूम व्हेअर इट हॅपन्ड' या पुस्तकातील गुप्त माहितीच्या उघडकीस आणण्याशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. तर एफबीआय संचालक काश पटेल यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली आहे.
छाप्यानंतर, काश पटेल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत म्हटले की, "कायद्याच्या वर कोणीही नाही. FBI एजंट एका मोहिमेवर आहेत. खरंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीत बोल्टन हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते. पण ट्रम्प यांच्याशी मतभेद झाल्यापासून ते सतत त्यांच्या धोरणांवर टीका करत आहेत. भारतावर लादलेल्या टॅरिफवरूनही त्यांनी ट्रम्पवर टीका केली होती.
हे संपूर्ण प्रकरण २०२० मध्ये प्रकाशित झालेल्या बोल्टन यांच्या पुस्तकाशी संबंधित आहे. ट्रम्प प्रशासनाच्या काळात अनेक गोपनीय गोष्टी पुस्तकात लिहिण्यात आल्या होत्या. ट्रम्प यांनी त्याचे प्रकाशन थांबवण्याचा प्रयत्नही केला होता, परंतु पुस्तक प्रकाशित झाले.
सप्टेंबर २०२० मध्ये, ट्रम्प सरकारच्या न्याय विभागाने या पुस्तकाबाबत चौकशी सुरू केली. आता ही चौकशी पुढे नेत, FBI ने छापा टाकला आहे. बोल्टन यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गोपनीय माहिती सार्वजनिक केल्याचा आरोप आहे.
एवढंच नाहीतर काही दिवस आधीच, बोल्टन यांनी ट्रम्प यांच्या विधानावर भाष्य केले, ज्यामध्ये ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी आणल्याचा दावा केला होता. यावर बोल्टन म्हणाले होते की, ती फक्त ट्रम्पची सवय आहे, ते सर्व काही श्रेय घेऊ इच्छितात. याचं भारताशी काहीही देणंघेणं नाही.