अमेरिकेत सशस्त्र आंदोलन शक्य; देशात हिंसाचार भडकण्याची शक्यता 

अमेरिकेत सशस्त्र आंदोलन शक्य; देशात हिंसाचार भडकण्याची शक्यता 

वॉशिंग्टन - कॅपिटॉलमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे अमेरिकेतील नागरिकांना बसलेला धक्का अद्याप ओसरला नसतानाच वीस जानेवारीला होणाऱ्या शपथविधी कार्यक्रमाच्या दिवशीच राजधानी वॉशिंग्टनसह अमेरिकेतील सर्व राज्यांमध्ये सशस्त्र आंदोलन करण्याचा कट रचला जात असल्याची माहिती ‘एफबीआय’ या तपास संस्थेला मिळाली आहे. यामुळे नियोजित अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या शपथविधी कार्यक्रमात अडथळा आणण्यासाठी ट्रम्प समर्थक कट्टरतावादी अधिक मोठा हिंसाचार घडवून आणण्याची शक्यता व्यक्त होत आहे.  

ट्रम्प समर्थक आणि कट्टर विचारसरणी असलेल्या काही संघटनांच्या ऑनलाइन नेटवर्कवरून विविध तारखांना आंदोलन करण्याची हाक दिली जात आहे. देशभरात १७ जानेवारीला आणि २० जानेवारीला वॉशिंग्टनमध्ये सशस्त्र आंदोलन करण्याचे आवाहन यावरून करण्यात येत आहे. ‘१६ ते २० जानेवारी दरम्यान सर्व ५० राज्यांमध्ये हिंसाचार घडवून आणला जाण्याचा अंदाज असून १७ ते २० जानेवारी दरम्यान कॅपिटॉलमध्येही आंदोलन होण्याची शक्यता आहे,’ असे ‘एफबीआय’च्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. बायडेन हे २० तारखेला अमेरिकेचे ४६ वे अध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. कमला हॅरिस यादेखील यावेळी उपाध्यक्षपदाची शपथ घेतील.

 दरवर्षी कॅपिटॉल इमारतीबाहेर हा कार्यक्रम होतो. गेल्याच आठवड्यात येथील सुरक्षा यंत्रणा भेदली गेली असतानाही याच ठिकाणी शपथ घेण्याचा बायडेन आणि हॅरिस यांचा इरादा आहे. 

कॅपिटालमध्ये ६ जानेवारीला मतमोजणी होऊन बायडेन विजयी झाल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अनिच्छेने पराभव स्वीकारत सत्तांतर सुरळीत करण्याचे आश्‍वासन दिले. मात्र, तरीही या निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा त्यांचा दावा कायम आहे. त्यांनी समर्थकांसमोरही हा दावा वारंवार केल्याने चिथावणी मिळून त्यांनी कॅपिटॉलवर हल्ला केला होता. या हल्ल्यासाठी ट्रम्प यांना जबाबदार ठरवित त्यांच्याविरोधात डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांनी महाभियोगाचा ठराव सादर केला आहे. 

‘स्टॉप द स्टील’ पोस्ट काढणार
दंगलीला चिथावणी मिळू नये म्हणून आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ‘स्टॉप द स्टील’ असा शब्दप्रयोग असलेल्या पोस्ट काढून टाकण्याचा निर्णय फेसबुकने घेतला आहे. 
बायडेन यांनी आपल्यापासून विजय चोरून नेला असल्याचा ट्रम्प यांचा दावा असल्याने त्यांनी वारंवार या शब्दप्रयोगाचा उल्लेख केला आहे.

‘सरकारवर हल्ला करा’

कॅपिटॉलवरील दंगलीवेळी ताकद कमी पडलेल्या पोलिस दलाने आपली सज्जता वाढीवली आहे. काही संघटना नागरिकांना विविध सरकारी कार्यालयांवर हल्ले करण्याचे आवाहन करत असल्याने पोलिस सावध झाले आहेत. नियोजित अध्यक्ष बायडेन, कमला हॅरिस आणि लोकप्रतिनिधीगृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांच्या जीवाला धोका असल्याचेही सांगितले जात आहे. शपथविधीच्या दिवशी वॉशिंग्टनमध्ये १५ हजार अतिरिक्त पोलिस तैनात केले जाणार आहेत. त्यांनी आतापासूनच मोक्याच्या ठिकाणांचा ताबा घेत तपासणी सुरु केली आहे.

वॉशिंग्टनमध्ये आणीबाणी
हिंसाचार भडकण्याची शक्यता असल्याने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टनमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे. ही आणीबाणी २४ जानेवारीपर्यंत लागू असेल. सामान्य नागरिकांच्या संपत्तीचे आणि त्यांच्या जीवांचे संरक्षण व्हावे, यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com