अखेर गडी झुकला; डोनाल्ड ट्रम्पना बायडेन यांचा विजय मान्य

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 15 November 2020

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडेन विजयी झाल्याचे मान्य केले आहे

वॉशिंग्टन- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडेन विजयी झाल्याचे मान्य केले आहे. ट्रम्प यांनी ट्विटमध्ये याचा उल्लेख केला आहे. त्याचबरोबर अध्यक्षीय निवडणूक गैरमार्गाने त्यांच्यापासून दूर नेण्यात आली, असंही ते म्हणाले आहेत. 

अध्यक्षीय निवडणुकीत ज्यो बायडेन विजयी झाल्याचे स्पष्ट झाले होते. तरीही डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन यांचा विजय आणि आपला पराभव झाल्याचे मान्य केले नाही. निवडणुकीत मोठा घोटाला झाला आहे, असं म्हणत त्यांनी सुप्रिम कोर्टात जाण्याचा इशारा दिला होता. सुप्रिम कोर्टात निर्णय बदलेल अशी भोळी आशा ट्रम्प यांना होती. अखेर ट्रम्प यांना शहाणपण आल्याचे दिसत आहे. त्यांनी अप्रत्यक्षपणे बायडेन यांचा विजय झाल्याचे कबुल केले आहे.  

ज्यो जिंकलेत कारण त्यांनी निवडणुकीत गैरप्रकार केला आहे. मतगणना होत असताना कोणताही निरीक्षक त्याठिकाणी उपस्थित नव्हता. मतमोजणी डाव्या विचारसरणीच्या खाजगी कंपनीकडून झाली आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, अध्यक्षीय निवडणूक जिंकण्यासाठी 270 इलेक्टॉरल मतांची आवश्यकता असते, बायडेन यांनी पेनेसेल्वेनिया जिंकून आपले अध्यक्षपद पक्क केलं.

दरम्यान, अमेरिकेची यंदाची राष्ट्राध्यक्षाची निवडणूक सर्वाथाने वेगळी ठरली. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बॅलेट इन पद्धतीने मतदान झाले. त्याचमुळे मतगणना व्हायला अनेक दिवस लागले. डोनाल्ड ट्रम्प यांनी मतदान पद्धतीवर आक्षेप घेत निवडणूकीत घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला. तसेच त्यांनी कोर्टामध्येही जाण्याचा इशारा दिला. बायडेन यांचा विजय होऊनही त्यांनी व्हाईट हाऊस न सोडण्याचे सुतोवाच केले. त्यामुळे परिस्थिती अधिकच गुंतागुतीची बनलीये.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: finally donald trump accepted joe biden victory