कृष्णविवराचा पहिला फोटो 'क्‍लिक'

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 एप्रिल 2019

अंतराळातील अवाढव्य तारे, उल्का; पण एवढेच काय तर प्रकाशकिरणांनाही अवघ्या काही क्षणांत गिळकृंत करणाऱ्या कृष्णविवराचे पहिले छायाचित्र टिपण्यात खगोल अभ्यासकांना यश मिळाले आहे.

पॅरिस : अंतराळातील अवाढव्य तारे, उल्का; पण एवढेच काय तर प्रकाशकिरणांनाही अवघ्या काही क्षणांत गिळकृंत करणाऱ्या कृष्णविवराचे पहिले छायाचित्र टिपण्यात खगोल अभ्यासकांना यश मिळाले आहे. आज हे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले. आपल्या सौरमालेमध्ये अस्ताव्यस्त पसरलेल्या या कृष्णविवराभोवती गुरुत्वाकर्षण शक्तीचे अभेद्य असे आवरण आढळले आहे. 

या गडद काळ्या कृष्णविवराभोवती नारंगी रंगाच्या वायूचे प्रभामंडळ स्पष्टपणे दिसून येते, हे कृष्णविवर 50 दशलक्ष प्रकाशवर्षे दूर असून ते "एम-87' या नावाने ओळखले जाते. ब्रुसेल्स, शांघाय, टोकियो, वॉशिंग्टन, सॅंटिगो आणि तैपेई येथील पत्रकार परिषदांमध्ये आज याची घोषणा करण्यात आली. या कृष्णविवराचे छायाचित्र टिपण्यासाठी आवश्‍यक डेटा 2017 मध्ये "इव्हेंट होराईझन टेलिस्कोप'नेच संकलित केला होता. या दुर्बिणीच्या नेटवर्कमध्ये जगभरातील आठ रेडिओ दुर्बिणींचा समावेश आहे. 

तापमानाची नोंद 
या प्रकल्पात सहभागी असलेले जर्मनीतील "ॅक्‍स प्लॅन्क इन्स्टिट्यूट'चे संशोधक डॉ. धन्या नायर "सकाळ'शी बोलताना म्हणाले, ""या ऐतिहासिक प्रकल्पात सहभागी होणे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कृष्णविवराभोवतीच्या तापमानाची निरीक्षणे नोंदविण्याचे काम आमच्या गटाकडे होते. कृष्णविवराजवळील नऊ गॅलिक्‍टीक केंद्रकांच्या एक मिलिमीटर रेडिओ लहरींचा अभ्यास आम्ही केला आहे.'' 

अशी होते निर्मिती 
विश्‍वनिर्मितीच्या वेळी झालेल्या महाविस्फोटातून अनेक कृष्णविवरांची निर्मिती झाल्याचे संशोधक सांगतात; तसेच आपल्या सूर्यापेक्षा शेकडोपटीने जास्त वजन असलेला तारा मरण पावल्यानंतर म्हणजेच त्यातील हायड्रोजन एकत्रीकरण (फ्युजन) प्रक्रिया बंद पडते, त्यानंतर गुरुत्वाकर्षणाच्या प्रचंड दबावामुळे त्याचे कृष्णविवरात रूपांतर होते. सर्वच आकाशगंगा महाकाय कृष्णविवराभोवती गोलाकार फिरत असतात. 

शोधाचे परिणाम 
विश्‍वाच्या निर्मितीचे कारण समजणार 
आईन्स्टाईनच्या गुरुत्वाकर्षणाची रहस्ये उलगडणार 
विश्‍वाच्या विस्ताराची कारणेही समजणार 
अंतराळातील गूढ घटनांचा शोध घेता येणार  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: First Photo of Black Hole published today