Forbes Most Powerful 100 Women : निर्मला सीतारामन यांच्यासहित भारतीय महिलांचा गौरव

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 December 2020

फोर्ब्स दरवर्षी जगातील सर्वांत सामर्थ्यवान महिलांची यादी जाहीर करते.

नवी दिल्ली : फोर्ब्स दरवर्षी जगातील सर्वांत सामर्थ्यवान महिलांची यादी जाहीर करते. यावर्षीही फोर्ब्सने ही यादी जाहीर केली आहे. काल 8 डिसेंबर राजी ही यादी फोर्ब्सकडून जाहीर करण्यात आली आहे. फोर्ब्सकडून जाहीर करण्यात आलेली ही आजवरची 17 वी यादी आहे. या यादीत अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस, भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन, बायोकॉनच्या संस्थापक किरण मजूमदार-शॉ तसेच एचसीएल एन्टरप्रायझेसच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोशनी नाडार-मल्होत्रा यांचा समावेश आहे. फोर्ब्सने जी यादी जाहीर केलीय त्या यादीत जर्मनीच्या चान्सलर एंजेला मार्केल यांना सर्वांत पहिलं स्थान देण्यात आलं आहे. या यादीत अमेरिकेच्या नवीन उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांना तिसरं स्थान मिळालं आहे. तर भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना 41 वे स्थान देण्यात आलं आहे. फोर्ब्सच्या या 17 व्या वार्षिक 'फोर्ब्स पॉवर लिस्ट'मध्ये 30 देशांतील महिलांचा समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा - चीनचं रडगाणं सुरुच; भारत-अमेरिकेनंतर आता ऑस्ट्रेलियातून कोरोना पसरल्याचा दावा

फोर्ब्सच्या या यादीत 10 देशांतील प्रमुख महिला, 38 मुख्य कार्यकारी अधिकारी, मनोरंजन क्षेत्राशी निगडीत 5 महिलांचा समावेश आहे. या साऱ्या महिलांचं नागरिकत्व, वय आणि त्यांचं क्षेत्र वेगवेगळं असलं तरीही त्यांनी 2020 मध्ये आलेल्या वेगवेगळ्या आव्हानांचा सामना केला असून आपल्याला मिळालेल्या व्यासपीठाचा तसेच संधीचा वापर योग्यरित्या केला असल्याचं फोर्ब्सने म्हटलं आहे. भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या यादीमध्ये 41 व्या स्थानावर आहेत. तर एचसीएलच्या रोशनी नाडार-मल्होत्रा या 55 व्या स्थानावर आहेत. किरण मजूमदार शॉ या 68 व्या स्थानावर आहेत. तर लँडमार्क समूहाच्या प्रमुख असणाऱ्या रेणुका जगतीयानी या 98 व्या स्थानावर आहेत. जर्मनीच्या चान्सलर असणाऱ्या एन्जेला मार्केल या सलग दहाव्या वर्षी आपलं पहिल्या क्रमांकावरील स्थान टिकवून आहेत. 

फोर्ब्सने म्हटलंय की, एन्जेला मार्केला या युरोपातील एक प्रमुख नेत्या आहेत. जर्मनीसारख्या देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढून त्या एका मोठ्या अर्थव्यवस्थेचं नेतृत्व यशस्वीपणे करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध करुन जर्मनीमध्ये दहा लाख निर्वासितांना राहण्याची परवानगी देणाऱ्या मार्केल या एक खंबीर नेतृत्व आहेत. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणाऱ्या कमला हॅरिस या यादीत तिसऱ्या स्थानी आहेत. तर न्यूझीलंडच्या जेसिंडा आर्डन या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत. कोरोनाच्या महामारीदरम्यान कडक लॉकडाऊन लागू करुन आपल्या देशाला वाचवल्याबद्दल त्यांचं कौतुक करण्यात आलं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: forbes 2020 list of 100 most powerful women finance minister nirmala sitharaman kiran mazumdar shaw in list