
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांना कोरोना झाला असून, नुकतेच रुजू झालेले रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद यांची चाचणीही पॉझिटिव्ह आली आहे.
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांना कोरोना झाला असून, नुकतेच रुजू झालेले रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद यांची चाचणीही पॉझिटिव्ह आली आहे. अब्बासी 61 वर्षांचे असून पाकिस्तान मुस्लिम लिगचे (नवाझ गट) वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत. नवाझ शरीफ यांना भ्रष्टाचाराच्या खटल्यात न्यायालयाने पदच्युत केल्यानंतर दहा महिन्यांसाठी त्यांच्याकडे पंतप्रधानपदाची सूत्रे होती. रविवारी पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते शार्जील मेमन यांचीही चाचणी पॉझिटिव्ह आली होती.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
दरम्यान, पाकिस्तानमध्ये गेल्या चोवीस तासांमध्ये कोरोनाचे २६०३ नवे रुग्ण आढळल्याने या देशातील रुग्णसंख्येने पन्नास हजारांचा टप्पा ओलांडला आहे. पाकिस्तानमधील रुग्णांची संख्या ५०,६९४ झाली आहे. तसेच या देशात एका दिवसांत ५० जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १०६७ झाली आहे. पाकिस्तानमध्ये रुग्णसंख्या वाढत असूनही सरकारने आंतरराष्ट्रीय विमाने सेवेला परवानगी दिली आहे.
----------
दिल्लीत पुन्हा संघर्ष; नायब राज्यपालांचा केजरीवालांना दणका
----------
पाकिस्तानमधील कोरोनाच्या परिस्थितीवरून डॉन या ख्यातनाम दैनिकाचे संपादक फहद हुसैन यांनी इम्रान खान सरकारला धारेवर धरले होते. यावेळी त्यांनी पाकिस्तानपेक्षा उत्तर प्रदेशातील योगी सरकारने कोरोनाला चांगल्याप्रकारे नियंत्रणात ठेवल्याचे म्हटले होते. उत्तर प्रदेश सरकारने अत्यंत कठोरपणे लॉकडाऊन राबवला. पाकिस्तानात इम्रान खान सरकारला हे जमले नाही. उत्तर प्रदेशच्या तुलनेत पाकिस्तानातील लोकसंख्येची घनता कमी आहे. तसेच पाकिस्तानातील लोकांचे दरडोई उत्पन्नही जास्त आहे. तरीदेखील उत्तर प्रदेशात कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यात बऱ्याच अंशी यश आले. तसेच पाकिस्तानातील मृत्यूदरही उत्तर प्रदेशपेक्षा जास्त असल्याचे फहद हुसैन यांनी म्हटले होते.