ट्रंम्प यांच्या माजी सहकाऱ्याला अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

भारतीय वंशाचे हॉटेल व्यवसायिक दिनेश चावला यांना विमानतळावर साहित्य चोरल्या प्रकरणी अमेरिकेत अटक केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोबत हॉटेल व्यवसायात चावला यांची पुर्वी भागीदारी होती.

वॉशिंग्टन ः भारतीय वंशाचे हॉटेल व्यवसायिक दिनेश चावला यांना विमानतळावर साहित्य चोरल्या प्रकरणी अमेरिकेत अटक केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोबत हॉटेल व्यवसायात चावला यांची पुर्वी भागीदारी होती. 

चावला हे चावला हॉटेल्सचे सीइओ आहेत. आठवड्याच्या अखेरीस त्यांना मेंफीस आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॅगमधून साहित्य चोरताना पाहिले होते. पोलिसांनी सांगितले की, त्यांनी साहित्य चोरून सुटकेस आपल्या कारमध्ये ठेवली आणि परत विमान पकडण्यासाठी एअरपोर्टमध्ये परत गेले. एअरपोर्ट पोलिसांनी न्यूयॉर्क टाइम्सला सांगितले की, कारची तपासणी केली असता कारमध्ये साधारण महिनाभरापूर्वी चोरलेली सुटकेस आणि इतर साहित्य सापडले. 

चावला जेव्हा मेंफीस विमानतळावर परत आले, तेव्हा पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यावेळी त्यांच्याकडून चोरलेल्या दोन बॅग आणि त्यातील साहित्यही जप्त करण्यात आले. पोलिसांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्याची किंमत 4000 डॉलर इतकी असल्याचे सांगितले आहे. तसेच ते गेल्या अनेक वर्षांपासून असे साहित्य चोरत असल्याचे त्यांनी कबूल केले. मात्र त्यांनी चोरीचा तपशील पोलिसांना दिला नाही. 

चावला यांनी पोलिसांना सांगितले की, चोरी करणे चुकीचे आहे हे मला माहिती होते, मात्र तरीही उत्साह आणि काहीतरी उत्सुकतेपोटी चोरी करत होतो. चावला आणि त्यांचा भाऊ सुरेश चावला डेल्टामध्ये हॉटेल आणि मॉटेल्सची साखळी चालवतात. तसेच त्यांचे क्‍लिवलॅंड येथे एक आलिशान हॉटेलचे कामही सुरू आहे. हा उपक्रम ट्रम्प यांच्या संघटनेशी फेब्रुवारीपर्यंत संयुक्त भागीदारीत सुरू होता. 

मात्र ट्रम्प बंधू, डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर आणि एरिक यांनी फेब्रुवारीमध्ये या भागीदारीमधून माघार घेतली. नागरिकांच्या टीकेमुळे आम्ही हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्यांनी चावला यांची स्तुती केली. 

चावला आणि ट्रम्प यांचे 1988 पासून संबंध आहेत. चावला यांचे वडील व्ही. के. चावला यांना सीनियर ट्रम्प यांनी ग्रीनवूडमध्ये मॉटेल सुरू करण्यासाठी मदत केली होती. ट्रम्प यांनी थोरले चावला यांना बोलावून अल्पसंख्याकाकरीता लघुउद्योगासाठी कर्जासाठी प्रशासनाकडे अर्ज करण्यास सांगितले होते. त्यानंतर पूढे चावला या व्यवसायात यशस्वी झाले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former Trump colleague arrested