फ्रान्समधील आंदोलन चिघळले; पॅरिससह अनेक ठिकाणी हिंसाचार

पीटीआय
सोमवार, 10 डिसेंबर 2018

पॅरिस : इंधन दरवाढ आणि इतर जीवनावश्‍यक सेवांवरील करवाढीच्या विरोधात फ्रान्समध्ये सुरू असलेले यलो व्हेस्ट आंदोलन रविवारी चिघळले आहे. फ्रान्समधील अनेक शहरांमध्ये आंदोलनाचा भडका उडाला असून, रविवारी अनेक ठिकाणी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापटी झाल्याचे वृत्त आहे. रविवारी पोलिसांनी कारवाई करीत अटकसत्र सुरू केले असून, 1,700 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली. 

पॅरिस : इंधन दरवाढ आणि इतर जीवनावश्‍यक सेवांवरील करवाढीच्या विरोधात फ्रान्समध्ये सुरू असलेले यलो व्हेस्ट आंदोलन रविवारी चिघळले आहे. फ्रान्समधील अनेक शहरांमध्ये आंदोलनाचा भडका उडाला असून, रविवारी अनेक ठिकाणी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापटी झाल्याचे वृत्त आहे. रविवारी पोलिसांनी कारवाई करीत अटकसत्र सुरू केले असून, 1,700 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली. 

इंधन दरवाढ आणि इतर करांच्या धोरणांना विरोध करण्यासाठी फ्रान्समध्ये मागील तीन आठवड्यांपासून नागरिक रस्त्यांवर उतरले असून, अनेक ठिकाणी हिंसक आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन यलो व्हेस्ट चळवळ या नावाने ओळखले जात आहे. रविवारी अनेक ठिकाणी पोलिस आणि आंदोलक समोरासमोर आले होते. पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली असून, पोलिसांनी रविवारी मोठ्या प्रमाणात अटकसत्र राबविले असल्याची माहिती फ्रान्सच्या गृहमंत्रालयाकडून देण्यात आली. राजधानी पॅरिससह मार्सिल, बोरडेक्‍स, लियॉन आणि टौलूस आदी शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलनाचा भडका उडाला असल्याचे सांगण्यात आले. अनेक ठिकाणी आंदोलकांनी दुकानांचे नुकसान केले असून, वाहनांना आगी लावल्या. 

रबरी गोळ्या, अश्रुधुराचा मारा 

वाढता हिंसाचार रोखण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर रबरी गोळ्यांचा मारा करीत अश्रुधुराची नळकांडी फोडली. त्यानंतर आंदोलक काही प्रमाणात शांत झाले असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. सुमारे एक लाख 36 हजार नागरिकांनी शनिवारी आंदोलनात भाग घेतल्याची माहिती गृहमंत्रालयाकडून देण्यात आली. एक डिसेंबर रोजी झालेल्या आंदोलनामध्येही एवढ्याच संख्येने नागरिक सहभागी झाले होते. 

इंधन दरवाढीविरोधातील यलो वेस्ट चळवळ हिंसक विचारांच्या लोकांनी ताब्यात घेतल्याचा दावा फ्रान्सच्या मंत्र्यांनी केला आहे. 

हिंसाचार आणि अटकसत्र 

- पोलिसांनी 1723 आंदोलकांना ताब्यात घेतले 
- पॅरिसमध्ये शनिवारी 1,082 जणांना अटक 
- शनिवारच्या आंदोलनामध्ये एक लाख 36 हजार जणांचा सहभाग 
- राजधानी पॅरिसच्या रस्त्यांवर हिंसाचार, दुकाने, वाहनांची नासधूस 
- चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवू ः अध्यक्षांचे आवाहन 

अध्यक्ष मॅक्रॉन गोत्यात 

हवामानातील बदलांना आळा घालण्याच्या दृष्टीने कार्बन टॅक्‍स लावण्याच्या सरकारच्या धोरणामुळे इंधनाच्या दरांवर वाढ झाली आहे. याचा थेट फटका सहन करावा लागत असलेल्या फ्रान्समधील नोकरदार वर्गाने अध्यक्ष मॅक्रॉन यांच्या विरोधात थेट बंड पुकारले आहे. मॅक्रॉन हे श्रीमंत, उच्चभ्रू वर्गाला धार्जिणी धोरणे राबवत असल्याचा आरोप करीत त्यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. मॅक्रॉन राजीनामा द्या, अशा घोषणांनी पॅरिसमधील रस्ते दणाणून गेले आहेत. निवडणुकीवेळी मॅक्रॉन यांना पाठिंबा देणारेच आता त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरत आहेत. 

आंदोलकांच्या मागण्या 

इंधनावरील कर रद्द करावा, चांगले वेतन, समाधानकारक पेन्शन, विद्यापीठात शिक्षणासाठी सोयीसुविधा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: French agitation are Increased violence in Various places